जानकी दादींच्या हस्ते नाशिकमध्ये झाले होते प्रधान केंद्रांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:22 AM2020-03-28T00:22:38+5:302020-03-28T00:23:03+5:30
प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख राजयोगिती ब्रह्मकुमारी डॉ. जानकी दादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत नाशकातील त्यांच्या २०१० मधील भेटीच्या आठवणी ब्रह्मकुमारी केंद्रावर जागविण्यात आल्या.
नाशिक : प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख राजयोगिती ब्रह्मकुमारी डॉ. जानकी दादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत नाशकातील त्यांच्या २०१० मधील भेटीच्या आठवणी ब्रह्मकुमारी केंद्रावर जागविण्यात आल्या.
१०४ वर्षे वयाच्या डॉ. जानकी दादी या केंद्राच्या मुख्य प्रशासकिय होत्याच शिवाय त्या स्वच्छतेसाठी सदीच्छा दूत देखील होत्या. माऊंट अबु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या प्रेरणेने देशभरात विविध प्रकारचे कार्य चालते. नाशिकमध्ये देखील हजारो अनुयायी या संस्थेच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. नाशिकमध्ये त्यांच्या निधनाचे वृत्त कळाल्यानंतर शहरातील संचारबंदीमुळे काही कार्यक्रम एकत्रीत होऊ शकले नाही. मात्र, शहरातील ११ केंद्रांवर तीन दिवसीय ध्यान धारणेस प्रारंभ झाला.
शरीर नश्वर असते. मात्र, आत्मा हा अन्यत्र अखंडीत कार्यासाठी पुढे जातो. दादींनी समाजासाठी खूप कार्य केले. परंतु शरीराने काम करताना येणाऱ्या अडथळ्यातून आत्मा मुक्त झाला आहे. त्यामुळे त्या अधिक व्यापक कार्य करू शकतील यासाठी प्रार्थना करण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. नाशिकमधील मेरी रोड येथे संस्थेचे प्रधान कार्यालय २०१० मध्ये सुरू झाले. त्याचे उदघाटन दादींच्या हस्ते करण्यात आले होते. त्याच्या आठवणीही वासंती दिदी यांनी जागवल्या.
डॉ. दादी जानकी यांच्याशी नाशिकमधील वासंतीदीदी यांच्यासह अन्य अनेकांचा स्नेह होताच. माउण्ट अबू येथे गेल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधता येत असे. अच्छाई आणि सच्चाई हे त्यांचे दोन गुण अनमोल होते अशा भावना नाशिक केंद्राच्या उपक्षेत्रीय संचालिका राजयोगीनी वासंतीदीदी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.