मुस्लीम समाजाकरिता ‘जनाजा’ रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:40 PM2020-01-19T23:40:17+5:302020-01-20T00:06:49+5:30
जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीमबहुल भागातील मृतदेह जुन्या नाशकातील जहांगीर, रसूलबाग कब्रस्तानापर्यंत आणताना समाजबांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे समाजाकडून मुस्लीम जनाजा वाहतूक वाहन उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत होती. मनपाच्या वतीने दोन वाहने (जनाजा रथ) उपलब्ध करून देण्यात आली.
नाशिक : जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीमबहुल भागातील मृतदेह जुन्या नाशकातील जहांगीर, रसूलबाग कब्रस्तानापर्यंत आणताना समाजबांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे समाजाकडून मुस्लीम जनाजा वाहतूक वाहन उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत होती. मनपाच्या वतीने दोन वाहने (जनाजा रथ) उपलब्ध करून देण्यात आली. या वाहनांचे शुक्र वारी नमाजनंतर जहांगीर कब्रस्तान प्रवेशद्वारावर लोकार्पण करण्यात आले. यावेळी शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी फातेहापठण करून विशेष दुवा मागितली.
मुस्लीम समाजाकरिता वैकुंठ रथाच्या धर्तीवर ‘जनाजा रथ’ उपलब्ध व्हावेत, यासाठी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी पाठपुरावा करत महासभेत ठराव मांडला व महासभेने तो मंजूर करून घेतला. सुमारे ३५ ते ४० हजार
रुपये खर्च करून महिंद्र कंपनीचे दोन लहान टेम्पो या प्रकाराची वाहने खरेदी करण्यात आली. या वाहनांची जनाजा रथ ठेवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रचना करून जनाजा वाहून नेण्यासाठी वाहन तयार केले. यामध्ये मृतदेहाचा जनाजा ठेवण्यासाठी मजबूत स्टँड बनविण्यात आला आहे. नातेवाइकांना उभे राहण्यासाठी व दफनविधी साहित्य ठेवण्यासाठी मुबलक जागा आहे. मुस्लीम समाजासाठी मोफत दफनविधी साहित्य मनपाकडून पुरविले जाते. जनाजा रथाची उणीव प्रकर्षाने जाणवत होती, म्हणून मनपा प्रशासनाकडे लोकप्रतिनिधी या नात्याने पाठपुरावा केला. महासभेत प्रस्ताव मांडला व त्याला मंजुरी मिळाल्याने समाजाची मोठी समस्या सुटण्यास मदत झाली, असे सय्यद यावेळी म्हणाले. जहांगीर कब्रस्तानच्या प्रवेशद्वाराजवळ फातेहापठण होऊन जनाजा वाहनांचे लोकार्पण झाले. आज झालेल्या फातेहाखॉनीप्रसंगी शहर-ए-काझी मोईजोद्दीन सय्यद, एजाज काझी, गुलशने तैबा मशिदीचे नायब इमाम अब्दुल सलाम, रिजवान खान आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपनगरांना फायदा
जुने नाशिक भागात मुस्लीम समाजाचे मोठे कब्रस्तान आहेत. त्यामुळे सातपूर, अंबड, नाशिकरोड, पंचवटी, वडाळागाव, अशोका मार्ग, पखालरोड, भारतनगर, भाभानगर, उपनगर, टाकळी आदी परिसरातील राहणाºया मुस्लीम समाजबांधवांना जनाजा रथांचा फायदा होणार आहे. राहत्या घरापासून कब्रस्तानापर्यंत दफनविधीकरिता नेण्यासाठी हे रथ उपयोगी ठरणार आहेत.