लोकार्पण : मुस्लिम समाजाला मनपाकडून प्रथमच मिळाले 'जनाजा रथ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 07:54 PM2020-01-18T19:54:30+5:302020-01-18T19:57:25+5:30
नाशिक : जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीम बहुल भागातील मृतदेह जुनी नाशकातील जहांगीर, रसुलबाग कब्रस्तानपर्यंत आणताना अडचणींचा सामना ...
नाशिक : जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीम बहुल भागातील मृतदेह जुनी नाशकातील जहांगीर, रसुलबाग कब्रस्तानपर्यंत आणताना अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे समाजाकडून मुस्लीम जनाजा वाहतूक वाहन उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत होती. मनपाच्या वतीने दोन वाहने (जनाजा रथ) उपलब्ध करून देण्यात आली. या वाहनांचे शुक्रवारी नमाजनंतर जहांगीर कब्रस्तान प्रवेशद्वारावर लोकार्पण करण्यात आले. यावेळी शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी फातेहापठण करून विशेष दुवा मागितली.
शहरातील मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच मनपाने 'जनाजा रथ' उपलब्ध करून दिले. यासाठी
नगरसेवक मुशीर सय्यद यांनी पाठपुरावा करत महासभेत ठराव मांडला व महासभेने तो मंजूर करून घेतला. सुमारे 35 ते 40 हजार रुपये खर्च करून महिंद्र हेव्ही ड्यूटी मिनी ट्रक ही वाहने खरेदी करण्यात आली आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना करून जनाजा वाहून नेण्यासाठी वाहन तयार केले. मोफत अंत्यविधी प्रमाणेच दफनविधी साहित्य मनपाकडून पुरविले जाते. मुस्लिम समाजासाठी जनाजा रथची उणीव प्रकर्षाने जाणवत होती, म्हणून मनपा प्रशासनाकडे लोकप्रतिनिधी या नात्याने पाठपुरावा केला. महासभेत प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर झाला यामुळे समाजाची मोठी समस्या सुटण्यास मदत झाली, असे सैय्यद यावेळी म्हणाले. आज हजरत सय्यद इमाम शाह बाबारोड येथील जहांगीर कब्रस्तानच्या प्रवेशद्वाराजवळ फातेहापठण होऊन जनाजा वाहनांचे लोकार्पण झाले. यामध्ये मृतदेहाचा जनाजा ठेवण्यासाठी मजबूत स्टँड बनविण्यात आला आहे. नातेवाईकांना उभे राहण्यासाठी व दफनविधी साहित्य ठेवण्यासाठी मुबलक जागा आहे. जुने नाशिक भागात मुस्लीम समाजाचे मोठे कबरस्तान आहेत. त्यामुळे सातपूर, अंबड, नाशिकरोड, पंचवटी, वडाळागाव, अशोका मार्ग, पखालरोड, भारतनगर, भाभानगर आदी परिसरातील मुस्लीम मृतदेह राहत्या घरापासून कब्रस्तानपर्यंत दफनविधी करिता नेण्यासाठी हे रथ उपयोगी ठरणार आहेत. आज झालेल्या फातेहाखॉनी प्रसंगी शहर -ए- काझी मोईजोद्दीन सैय्यद, एजाज काझी, गुलशने तैबा मशिदीचे नायब इमाम अब्दुल सलाम, रिजवान खान आदी मान्यवर उपस्थित होते.