जानोरी आरोग्य केंद्र बंद अवस्थेत
By admin | Published: May 24, 2016 11:56 PM2016-05-24T23:56:48+5:302016-05-25T00:05:32+5:30
ग्रामस्थांचे हाल : लसीकरण होते अंगणवाडीत
दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.२ तीन ते चार महिन्यांपासून सतत बंद अवस्थेत असल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचारी अंगणवाडीत बसून लसीकरण करतानाचे चित्र आहे. ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत जानोरी येथे लोकसंख्यानुसार केंद्र- १ व केंद्र- २ अशी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. केंद्र-१ हे वरच्या कोळीवाड्यात आहे, तर केंद्र-२ हे महात्मा फुले विद्यालयाच्या समोर बसथांबा जवळ आहे. परंतु काही किरकोळ कारणास्तव प्राथमिक आरोग्य केंद्र-२ तीन ते चार महिन्यांपासून बंद अवस्थेत असून, गैरसोयीमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. आरोग्य कर्मचारी लसीकरणाच्या दिवशी अंगणवाडीत बसून लसीकरण मोहीम राबवितानाचे चित्र आहे. आरोग्य केंद्र-२ ला जऊळके दिंडोरी हे गाव जोडले गेले आहे; परंतु आरोग्य केंद्राला कुलूप पाहून ग्रामस्थ आल्या पावली परतीचा मार्ग धरतात. या दोन्हीही आरोग्य केंद्रांत अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांची संख्या गरजेपेक्षा कमी होती.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन लसीकरण माहीम राबविणे गरजेचे आहे. मात्र असे न घडता येथील कर्मचारी कोणत्याही ठिकाणी राहतात अथवा तिथेच वावरताना दिसतात. आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे दवाखान्यात कोणकोणत्या प्रकारची औषधे आहेत हेदेखील ग्रामस्थांना समजत नाही. अनेकवेळा ही बाब ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी आर.पी. पालवी यांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र अद्याप यावर कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही.
आरोग्य केंद्रामार्फत जननी सुरक्षा व मातृत्व सुरक्षाचे धनादेश वाटप केले जातात. मात्र आरोग्य केंद्रच बंद असल्याने ग्रामस्थांनी नेमके कुठे जायचे, असा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे ग्रामस्थांना व रुग्णांना चार कि.मी. अंतरावरील मोहाडी येथे जावे लागते. तरी आरोग्य केंद्र विभागाने येथील कर्मचाऱ्यांना योग्य समज देऊन आरोग्य केंद्र लवकरात लवकर नियमित सुरू करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली
आहे. (वार्ताहर)