जनस्थान महोत्सवास प्रारंभ
By admin | Published: June 23, 2017 12:22 AM2017-06-23T00:22:07+5:302017-06-23T00:22:19+5:30
‘जनस्थान फेस्टिव्हल’ला गुुरुवारी दिमाखात प्रारंभ झाला. या फेस्टिव्हलची सुरुवात स्वर्गीय तबलावादक प्रमोद भडकमकर यांना ‘मरणोत्तर जनस्थान आयकॉन’ पुरस्कार देऊन झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘जनस्थान’ या कलावंतांच्या व्हॉट््स अॅप ग्रुपच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जनस्थान फेस्टिव्हल’ला गुुरुवारी (दि. २२) मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. या फेस्टिव्हलची सुरुवात स्वर्गीय तबलावादक प्रमोद भडकमकर यांना ‘मरणोत्तर जनस्थान आयकॉन’ पुरस्कार देऊन झाली.
परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजित या कार्यक्रमात प्रा. डॉ. मो. स. गोसावी आणि पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते भडकमकर यांच्या कुटुंबीयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी प्रमोद भडकमकर यांनी साथसंगत केलेल्या कलावंतांनी गायन, वादन, नृत्यातून स्वर्गीय भडकमकर यांना भावांजली वाहिली. या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रा. डॉ. मो. स. गोसावी यांनी कलाकारांनी आपली कला सादर करताना त्यातून मनस्वी आनंद देणे आवश्यक आहे. तसेच कलेचे दालन अधिकाधिक समृद्ध व्हावे यासाठी जनस्थानसारख्या ग्रुपने पुढे येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रमोद भडकमकर यांच्याबद्दल शोक व्यक्त करताना प्रा. गोसावी यांनी वैयक्तिक मी आणि गोखले एज्युकेशन सोसायटी भडकमकर कुटुंबीय तसेच वैष्णवी भडकमकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांस्कृतिक क्षेत्राची परंपरा अशीच कायम सुरू रहावी यासाठी जनस्थान ग्रुपवर विशेष जबाबदारी असल्याचे सांगतानाच वैष्णवी भडकमकर हिने प्रमोद भडकमकरांचा वारसा पुढे अव्याहत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ‘समर्पण’ या संकल्पनेवर आधारित फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी प्रमोद भडकमकर यांनी साथसंगत केलेल्या कलाकारांनी आपल्या कलेतून भडकमकर यांना भावांजली वाहिली.
दरम्यान, फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २३) संगीत आणि अभिनयाच्या क्षेत्रात ज्या कलाकारांनी नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले अशा पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्काराने सन्नानित करण्यात येणार असून, या कार्यक्रमास सिनेदिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवार (दि. २४) पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन जनस्थान ग्रुपचे अॅडमीन अभय ओझरकर यांनी केले आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रमोद भडकमकर यांच्या जीवनावर आधारित ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले.