सोनांबे शिवारात जपानी पध्दतीने वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:33 PM2019-07-01T17:33:12+5:302019-07-01T17:33:51+5:30
सिन्नर : वन महोत्सवानिमित्त सिन्नर घोटी महामार्गालगत सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगर येथे वनप्रस्थ फाउंडेशन व ‘तुफान आलंया’च्या जलमित्रांच्या व वृक्षप्रेमींच्यावतीने ‘जपानी मियावाकी फोरेस्ट प्लांटेशन’ पद्धतीने रविवारी ६०० रोपांची लागवड करण्यात आली. सप्ताहात ४०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
तीन वर्षांपासून वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक आई भवानी डोंगर येथे वृक्षारोपण व संवर्धन करीत आहेत. गतवर्षी देखील सिन्नर मधील पहिलाच जपानी मियावाकी या घनदाट पद्धतीने वनलागवडीचा प्रयोग करत ५०० रोपांची लागवड करण्यात आली होती. संपूर्ण वर्षभर वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक सुनील विशे, उमेश देशमुख, नाना माळी, अभिजीत देशमुख हे वर्षभर या झाडांचे संवर्धन करीत आहेत. आई भवानी देवस्थानचे विश्वस्थ बाजीराव बोडके हे देखील आपल्या कुपनलीकेचे पाणी देऊन वृक्षारोपणास सहकार्य करीत असतात. यावर्षी जलमित्र दत्ता बोराडे, डॉ. महावीर खिवंसरा, राजाभाऊ क्षत्रिय, अनिल जाधव, नितीन खिवंसरा तसेच नगरसेवक प्रमोद चोथवे यांच्यासह स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. वनप्रस्थचे स्वयंसेवक व वृक्षमित्र यांच्या नियोजनामुळे एकाच वेळी ६०० रोपांची लागवड करता आली. सिन्नरमधील अशा प्रकारच्या जपानी मियावाकी फॉरेस्ट प्लांटेशन या पद्धतीने वृक्ष लागवड करून वर्षभर वृक्ष संवर्धन करणारी वनप्रस्थ फाउंडेशन ही एकमेव संस्था असल्याचे वनमहोत्सवानिमित्त सुनील विशे यांनी सांगितले. झाडांच्या उत्तम वाढीकरिता त्यांना खास सेंद्रिय खत देखील टाकण्यात आले.