'जटायू' संवर्धनात नाशिक राज्यात अग्रेसर - सुधीर मुनगंटीवार
By अझहर शेख | Published: January 29, 2024 06:08 PM2024-01-29T18:08:11+5:302024-01-29T18:09:00+5:30
नाशिक शहरातील विविध पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांनी एकत्र येत सोमवारी (दि.२९) कुसुमाग्रज स्मारकात आयोजित केलेल्या निसर्ग सेवकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुनगंटीवार बोलत होते.
नाशिक : पर्यावरण व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नाशिककर नेहमीच जागरूक राहिले आहे. येथील पर्यावरणवादी सामाजिक संस्थांनी पर्यावरण संरक्षणाची चळवळसातत्याने वाढवत बळकट केली आहे. यामुळे जटायू संवर्धनातसुद्धा नाशिक राज्यात अग्रेसर ठरेल यात शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नाशिक शहरातील विविध पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांनी एकत्र येत सोमवारी (दि.२९) कुसुमाग्रज स्मारकात आयोजित केलेल्या निसर्ग सेवकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार देवयानी फरांदे, मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, बेळगाव ढगा गावाचे सरपंच दत्तु ढगे उपस्थित होते. मनुष्य हा स्वार्थी प्राणी असून त्यापैकीच काही लोक आज पर्यावरणाच्या समस्या निर्माण करत आहेत. अशा ‘शेखचिल्लीं’पासून पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करणे काळाची गरज आहे. यासाठी पर्यावरण व निसर्गप्रेमी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी यावेळी केले. प्रास्ताविक मनोज साठे यांनी केले. तुषार पिंगळे, दीपा ब्रम्हेचा यांनी सुत्रसंचालन केले. आभार अंबरीश मोरे यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
१) वैद्य शंकर शिंदे, खोरीपाडा हरसूल
२) देवीचंद महाले, त्र्यंबकेश्वर
३) जुही पेठे, नाशिक
४) इको-एको वन्यजीव संस्था, वैभव भोगले
५) प्रतीक्षा कोठुळे, पक्षीप्रेमी
६) डॉ.अनिल माळी
दत्ता उगावकर.
७) पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार.
नाशिक ठरेल 'सिटी ऑफ जटायू'
पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सन्मानाला उत्तर देताना वनविभागाकडून गिधाड संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, नाशिक पश्चिम वनविभागाकडून हरसूल, पेठ व तळेगाव या तीन ठिकाणी गिधाडांसाठी उपहारगृह चालविले जात आहेत. अंजनेरी येथे शासनाकडून मिळालेल्या ८ कोटी रूपयांच्या निधीतून लवकरच गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र उभारणी केली जाणार आहे. यामुळे नाशिक लेपर्ड सिटी नंतर सिटी ऑफ जटायू ठरेल असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला.