जवान विठ्ठल पगार यांचे हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:06 AM2019-01-09T01:06:59+5:302019-01-09T01:11:34+5:30
सायखेडा : श्रीरामपूर (बागलवाडी) येथील जवान विठ्ठल रतन पगार (२८) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पगार यांच्या पश्चात पत्नी, वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.
सायखेडा : श्रीरामपूर (बागलवाडी) येथील जवान विठ्ठल रतन पगार (२८) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पगार यांच्या पश्चात पत्नी, वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.
विठ्ठल अवघ्या २०व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. पगार यांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. २२ मार्च २०१० रोजी भारतीय सैन्यातील बॉम्बे सॅपरमध्ये ते रुजू झाले होते. उत्तर प्रदेशमधील मेरठ, नागालँड, दिल्ली येथे सेवा बजावल्यानंतर चार दिवसांपूर्वीच त्यांची झांशी येथे बदली झाली होती. बदली झाल्यामुळे चार दिवसांची सुटी घेऊन पत्नी साक्षी यांना घेऊन जाण्यासाठी ते घरी आले. सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास भेंडाळी येथे मित्रांसमवेत गप्पा मारत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तत्काळ चांदोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सुभेदार टी. पी. लांगे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, तहसीलदार पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, सरपंच गोरख खालकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. अंत्यसंस्काराला गोदाकाठ परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जवान विठ्ठल कुटुंबाप्रमाणे गावाचा अभिमान होते. सुट्टीवर आल्यानंतर गावातील सर्व तरु ण, वृद्धांमध्ये मिळून मिसळून रहाणारा विठ्ठल आमच्यातून कायमचा निघून गेला. मात्र त्याचे कार्य नक्कीच प्रेरणादायी असून ते अनेक तरु णांसाठी प्रेरणा देणारे ठरेल.
ज्ञानेश्वर रोडे, ग्रामस्थ
अश्रूंचा फुटला बांध
गावापासून दोन किलोमीटर अंतरावरून शालेय विद्यार्थ्यांचे लेजीम पथक आणि भजनी मंडळ यांच्या संगीतमय साथीने पगार यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. आई शोभा, पत्नी साक्षी, वडील रतन, भाऊ संदीप यांच्यासह उपस्थित नातलगांनी एकच हंबरडा फोडला आणि दबलेल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. गावातील जवान आणि तरु ण मित्र आपल्याला कायमचा सोडून गेल्याच्या दु:खाची भावना मित्र परिवाराच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.
विठ्ठल यांचे २०१५ मध्ये सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री येथील साक्षी यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती सेवेच्या निमित्ताने बाहेर असल्याने चार वर्षानंतर पत्नीला सोबत नेण्यास सैन्य दलाने परवानगी दिली होती. दिल्ली येथील सेवा संपून झाशी येथे पत्नीसह राहाण्यास परवानगी मिळाल्याने पत्नीला घेण्यासाठी ते चार दिवसांपूर्वीच घरी आले होते. मात्र नियतीने घाला घातला.