जायकवाडी भरले; नाशिककर तरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:25 AM2017-09-24T00:25:11+5:302017-09-24T00:25:17+5:30

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने नाशिककरांसाठी दिलासा देणारी आनंदवार्ता दिली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्याहून अधिक होऊन तब्बल नऊ वर्षांनंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी जवळपास भरल्याने गंगापूर धरण समूहातून यंदा पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून उद्भवणाºया नाशिक-नगर-मराठवाडा यांच्यातील पाणीतंट्याला यावर्षी तरी तिलांजली मिळाली आहे.

 Jayakwadi filled; Nashikar liquid! | जायकवाडी भरले; नाशिककर तरले !

जायकवाडी भरले; नाशिककर तरले !

Next

नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने नाशिककरांसाठी दिलासा देणारी आनंदवार्ता दिली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्याहून अधिक होऊन तब्बल नऊ वर्षांनंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी जवळपास भरल्याने गंगापूर धरण समूहातून यंदा पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून उद्भवणाºया नाशिक-नगर-मराठवाडा यांच्यातील पाणीतंट्याला यावर्षी तरी तिलांजली मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाचे चटके सहन करत आला आहे. मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण हे बव्हंशी नाशिकमधील गंगापूर धरण समूहावर अवलंबून आहे. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा अत्यल्प असला, की गंगापूर धरण समूहासह नगर जिल्ह्यातील मुळा प्रकल्पातील पाण्याकडे लक्ष केंद्रित होते. जायकवाडीला पाण्याच्या आवर्तनावरून आजवर नगरसह नाशिकमध्ये वाद उद्भवले आहेत. सन २०१५ मध्ये गंगापूर धरणासह मुळा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला होता. जायकवाडीच्या उर्ध्व धरणांमध्ये पाण्याचा जेमतेम साठा शिल्लक असताना समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा पुढे करून महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशान्वये गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची कृती करण्यात आली होती.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पाणी आवर्तनासाठी आंदोलन करीत असताना त्यांना डावलून दुसरीकडे मराठवाड्याला पाणी सोडण्यात आल्याने नाशिकमध्ये मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. त्यातूनच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालय व राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनातही प्रचंड गाजले होते. मागील वर्षी, सन २०१६ मध्ये राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला. नाशिककरांना पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणही ९३ टक्क्याच्या आसपास भरले होते. त्यावेळी जायकवाडी धरणात ८८.७८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक असल्याने महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार धरणात ६५ टक्क्यापेक्षा अधिक पाणी साठा असल्यामुळे जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरण समूहातून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला होता. त्यानुसार, मागील वर्षी गंगापूर धरणसमूहातील जलसाठा टिकून राहिला परिणामी, नाशिककरांना पाणीटंचाईची धग जाणवली नाही.  यावर्षी तर वरुणराजाची कृपावृष्टी झाली आणि राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहताना दिसून येत आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठाही ९८ टक्क्यांहून अधिक झाल्याने नऊ वर्षांत प्रथमच धरणातील १८ दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गंगापूर धरणातील मुबलक पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर नाशिककरांना करता येणार आहे. गंगापूर धरण समूहासह जायकवाडी धरणही भरल्याने किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिक-नगर-मराठवाडा वादाला तिलांजली मिळाली आहे.
जायकवाडीला सुमारे ६० टीएमसी पाणी
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून यंदा जायकवाडीला सुमारे ६० टीएमसीपेक्षाही अधिक पाणी जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे नऊ वर्षांनंतर प्रथमच जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे हे अर्ध्या फुटाने उघडून सुमारे १५ हजार क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. जायकवाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी जाऊन पोहोचण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला सहा वेळा पूर आलेला आहे. याशिवाय, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने अनेकदा विसर्ग करण्यात आलेला आहे.

Web Title:  Jayakwadi filled; Nashikar liquid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.