राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी जयंत जाधव
By admin | Published: May 29, 2015 11:43 PM2015-05-29T23:43:14+5:302015-05-29T23:45:35+5:30
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी जयंत जाधव
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या राष्ट्रवादी शहर व जिल्हा कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त सापडला असून, अपेक्षेनुसार अर्जुन टिळे यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी होऊन आमदार जयंत जाधव यांची शहराध्यक्षपदी, तर अॅड. रवींद्र पगार यांची दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणाऱ्या माजीमंत्री अर्जुन पवार यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये प्रथमच जिल्हा पातळीवर कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा कार्याध्यक्षपदी, जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सभापती विष्णुपंत म्हैसधुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोेन महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड रखडली होती. या निवडीचे अधिकार त्या त्या तालुक्यातील माजीमंत्र्यांनाच राष्ट्रवादीने सोपविले होते. त्यानुसार नाशिक जिल्'ातील नियुक्त्या करताना माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा शब्द प्रमाण मानूनच या नियुक्त्या केल्या गेल्याची चर्चा असून, त्यांच्या समर्थकांना झुकते माप मिळाल्याचे चित्र आहे. याबाबत दै. लोकमतने सर्वांत २७ एप्रिल रोजी आधी आमदार जयंत जाधव यांची शहराध्यक्ष पदी नाव निश्चित झाल्याचे व याबाबत केवळ औपचारिकता बाकी असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. जनसंपर्क, प्रतिमा व शहराच्या दृष्टीने प्रश्न सोडविण्याची कार्यक्षमता या बाबींमुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांची निवड निश्चित केल्याचे बोलले जात होते. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार जयंत जाधव यांनी आपल्याला शहराध्यक्ष पद भूषविण्यात रस नाही. एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार आपण आमदार पदावर असल्याने राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदासाठी आपल्याला कोेणताही रस नसल्याचे लगेचच दुसऱ्या दिवशी म्हटले होते. प्रत्यक्षात आता पद मिळाल्यानंतर त्यांनी ते नाकारण्याबाबत काहीही प्रतिक्रिया न दिल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.