जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:13 AM2018-06-18T00:13:28+5:302018-06-18T00:13:28+5:30
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ५० व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या २९ बॅचच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वखर्चातून एकेक वर्गाची जबाबदारी उचलून अवघ्या अडीच महिन्यांत शाळेचे नूतनीकरण करून रूपडेच बदलून टाकले आहे. स्मार्ट, अत्याधुनिक झालेली शाळा बघून सध्या शिकत असलेले विद्यार्थी खुश झाले आहेत.
नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ५० व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या २९ बॅचच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वखर्चातून एकेक वर्गाची जबाबदारी उचलून अवघ्या अडीच महिन्यांत शाळेचे नूतनीकरण करून रूपडेच बदलून टाकले आहे. स्मार्ट, अत्याधुनिक झालेली शाळा बघून सध्या शिकत असलेले विद्यार्थी खुश झाले आहेत. शाळेच्या बॅचच्या व्हॉट्सअॅप, फेसबुकवरील ग्रुपमुळे अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. बिटको इंग्लिश मीडियम स्कूलने ५०व्या वर्षात पदार्पण केले आहे. १९९५ च्या दहावीची बॅच असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे आॅक्टोबर २०१७ मध्ये गेटटुगेदर झाले. त्यावेळी ज्या शाळेत शिकून आपण मोठे झालो त्या शाळेला आपण काहीतरी देऊया असा विचार पुढे आल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या वर्गाचा रंग, खिडक्या, बेंचेस, पंखे आदी आपल्याच काळातील असून, जुनाट झाले आहेत. त्यामुळे आपण एक वर्ग संस्थेकडून घेऊन त्याचे नूतनीकरण करूया यावर सर्वांचे एकमत झाले.
कॉम्प्युटर, सायन्स लॅबचे अत्याधुनिक नूतनीकरण
शाळेतील संगणक लॅब अत्याधुनिक बनविली आहे. छताला पीओपी करून त्यामध्ये लावलेली डिझाईन तर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. तर सायन्स लॅबचेदेखील पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे. केमिकल वगळता मानवी सांगाडा, मशिनरी आदी सर्व वस्तू, साहित्य नवीन आणले आहे. शाळेच्या पोर्चमध्ये विविध महापुरुष, शास्त्रज्ञांचे विचार असलेल्या फ्रेम लावण्यात आल्या असून वर्गखोलीबाहेर माहिती कागद चिटकवण्याऐवजी एक फ्रेमच लावून दिली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीला नवीन कनेक्शन लावून वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे नूतनीकरण करताना कोणाचे नाव लिहिण्यात आले नसून कोणत्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी खर्च केला त्या वर्ग खोलीबाहेर ‘क्लासरूम रिनोवेटेड... बॅच’ अशी पाटी लावण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचा आदर्श पायंडा
जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल असलेले आपले प्रेम, आठवण एका चांगल्या उपक्रमाद्वारे प्रत्यक्षात आणून आदर्श पायंडा निर्माण केला आहे. याची सुरुवात झाल्यानंतर गेल्या अडीच महिन्यांत विविध बॅचचे अनेक माजी विद्यार्थी घरातील काम आहे, या पद्धतीने शाळा सुरू होण्याच्या आतच पूर्ण करायचे आहे असे झपाटल्याप्रमाणे स्वत:ला पूर्ण झोकून काम पूर्ण केले.