‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेला लागली कसोटी
By admin | Published: May 23, 2017 01:36 AM2017-05-23T01:36:46+5:302017-05-23T01:37:05+5:30
नाशिक : आयआयटी प्रवेशासाठी जेईई उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्स परीक्षा शहरातील तीन केंद्रांवर सुरळीत पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आयआयटी प्रवेशासाठी जेईई उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्स परीक्षा शहरातील तीन केंद्रांवर सुरळीत पार पडली. जेईई परीक्षेचा अनुभव असला तरी अॅडव्हान्समधील गणित या विषयाचा पेपर काहीसा कठीण गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. जेईईमध्ये देशात मुलींमध्ये प्रथम आलेली वृंदा राठी हिनेदेखील नाशिकमध्येच परीक्षा दिली असून, अॅडव्हान्समध्येही चांगले गुण मिळतील, असे तिने सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच नाशिकमध्ये अॅडव्हान्स परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे विभागातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्सची परीक्षा दिली. सदर परीक्षेत दुसऱ्या सत्रातील पेपर कठीण असल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला. शहरातील मविप्रच्या ठाकरे अभियांत्रिकी विद्यार्थी, के. के. वाघ अभियांत्रिकी आणि के. के. वाघ महाविद्यालय या तीन केंद्रांवर आयआयटी प्रवेशासाठी अॅडव्हान्सची परीक्षा घेण्यात आली. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर येथील विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्स परीक्षा दिली. अपेक्षेप्रमाणे परीक्षेची काठिन्य पातळी अधिक असेल असा अंदाज विद्यार्थ्यांना असल्याने त्यांनी तशी तयारीही केली होती. मात्र गणित, भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र विषयाच्या पेपरचीदेखील काठिन्यपातळी अधिक असल्याने विद्यार्थ्यांचा कस लागला. त्यातच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कठोर नियमांमुळेही त्रास सहन करावा लागला. ड्रेसकोडसाठी पालकांना ऐनवेळी धावाधाव करावी लागली. परीक्षेसाठी पालकही विद्यार्थ्यांबरोबरच असल्याने परीक्षा आवारात संभाव्य गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी पालकांना काही अंतरावरच थांबण्याचा सल्ला दिला. परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेला ड्रेसकोड निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार पालकांनी आपल्या पाल्याच्या गणवेशाबाबत विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले. दोन सत्रांत घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. तीनही परीक्षा केंद्रांवर पालकांची मोठी गर्दी झाल्याने दुचाकी लावण्यासाठी कसरत करावी लागली.