जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:32 AM2019-04-19T00:32:45+5:302019-04-19T00:33:44+5:30
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास दिंडोरीरोडवरून भरधाव जाणाऱ्या महिंद्र पीकअप मालवाहू जीपने (एम.एच.१५ एफ.व्ही ७५७९) फिर्यादी रोहित सुभाष दळवी (१९) यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.
नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास दिंडोरीरोडवरून भरधाव जाणाऱ्या महिंद्र पीकअप मालवाहू जीपने (एम.एच.१५ एफ.व्ही ७५७९) फिर्यादी रोहित सुभाष दळवी (१९) यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात रोहितसोबत दुचाकीवर बसलेला मित्र विशाल गांगुर्डे हा ठार झाला असून, रोहित व प्रतीक देशमुख हे युवक जखमी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीकअप जीप म्हसरूळ गावाकडून दिंडोरीच्या दिशेने भरधाव जात होती. यावेळी रोहित हा त्याच्या दुचाकीवरून (एम.एच.१५ जीएस ६३३९) मखमलाबाद-म्हसरूळ लिंकरोडने आपल्या मित्रांना घेऊन जात होता.
दरम्यान, दिंडोरीरोडवर तारांगण सोसायटीसमोर पीकअप जीपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रोहित, प्रतीक हे जखमी झाले तर विशाल हा मृत्युमुखी पडला. रोहितने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीकअपचा जीपचालक राजेंद्र केदा गावित (२४,रा. केदारपाडा, सुरगाणा) यास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक अहिरे करीत आहेत.