शिंदे येथे विहिरीत पडलेल्या बछड्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:19 AM2018-11-12T01:19:11+5:302018-11-12T01:19:27+5:30
शिंदे गाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. पहाटेच्या सुमारास बछडा विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नाशिकरोड : शिंदे गाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. पहाटेच्या सुमारास बछडा विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
येथील झाडे मळ्यात दिनकर नामदेव झाडे यांच्या शेताच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता. शेतात काम करणाऱ्या महिलांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नाने बछड्याला बाहेर काढून नंतर सोडून देण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव शिवारातील झाडे मळ्यात महिला शेतीकाम करीत होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास सिंधू झाडे या पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ गेल्या असत्या त्यांना बिबट्याचा बछडा पाण्यात पडलेला दिसला. त्यांनी ही बाब पती दिनकर झाडे यांना सांगितली. झाडे यांनी कृषी बाजार समितीचे संचालक संजय तुंगार यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी वनविभागाशी संपर्कसाधल्यानंतर काही वेळातच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले व सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर बछड्याला बाहेर काढण्यात यश आले. बाहेर येताच बछड्याने उसाच्या शेतात धूम ठोकली. घटनास्थळी वनपाल रवींद्र सोनार, वनसंरक्षक विजयसिंग पाटील, जी. बी. पंढरे, अनिल साळवे, वनमजूर सोमनाथ निबेंकर यांनी परिश्रम घेतले.
सातत्याने दर्शन
शिंदे-पळसे परिसरात उसाच्या शेतीत सातत्याने बिबट्या मादी आणि तिच्या बछड्यांचे अनेकांना दर्शन घडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे.