बंगल्यातून दागिन्यांची तिजोरीच पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:28 PM2020-01-29T22:28:47+5:302020-01-30T00:14:53+5:30
आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ‘आनंदव्हिला’ बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.२८) रात्री उघडकीस आली.
नाशिक : आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ‘आनंदव्हिला’ बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.२८) रात्री उघडकीस आली.
गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या रोमेश विजय लुथरा (३६) यांचा आनंदव्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांच्या घरात मोलकरणीसह अन्य नोकरदार वर्गही ये-जा करीत असतो. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला दवाखान्यात घेऊन कॉलेजरोडला गेले. यावेळी त्यांच्या बंगल्यात केवळ मोलकरीण होती. तिने घरगुती काम आटोपून साडेआठ वाजेच्या सुमारास बंगल्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून घर सोडताना संपर्क साधून माहितीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पावणेदहा वाजेच्या सुमारास लुथरा हे आपल्या आई, पत्नीसह घरी परतले असता घराचे कुलूप उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईने जेव्हा आपल्या बेडरूममधील कपाट उघडले तेव्हा, कपाटात ठेवलेले लॉकर गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब आपल्या मुलाला सांगितली. रोमेश यांनी बेडरूममध्ये जाऊन खात्री केली असता तिजोरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रोमेश यांनी त्वरित घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रोमेश यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पत्ताच नाही
बंगल्यात किंवा आवारात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यामुळे गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या गुन्ह्याबाबतचा कुठलाही सुगावा मंगळवारी उशिरापर्यंत लागलेला नव्हता. श्वानांनीदेखील बंगल्याच्या आवारापर्यंतच माग दाखविल्याचे समजते. चौकशीसाठी काही नोकरांनाही रात्री पोलिसांनी बोलविले होते.
चोरी झालेले दागिने असे...
मंगळसूत्र (३ तोळे) ९० हजार, हिरेजडीत मंगळसूत्र ५० हजार, हिऱ्यांच्या चार बांगड्या ८ लाख,
४ हिरेजडीत अंगठ्या ५ लाख, हिरेजडीत पेंडेट सेट ३ लाख, १० तोळे सोन्याचे पेंडेंट ३ लाख, सोन्याचा हार, आभूषणे ८ लाख ४० हजार, हिºयांचा सेट व आभूषणे ५ लाख ५० हजार, इम्पोर्टेड तीन मनगटी घड्याळे २ लाख ३० हजार, १ लाखाची रोकड, १५ हजारांचे लॉकर आदी.