पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:26 PM2019-01-07T13:26:53+5:302019-01-07T13:27:07+5:30
नांदगाव : दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने, हातचलाखी करत सव्वा लाखाच्या चार तोळे सोन्याच्या बांगड्या दोघा अज्ञात भामट्यांनी लंपास केल्याची घटना सराफ फाट्यावरील संतगल्लीत घडली.
नांदगाव : दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने, हातचलाखी करत सव्वा लाखाच्या चार तोळे सोन्याच्या बांगड्या दोघा अज्ञात भामट्यांनी लंपास केल्याची घटना सराफ फाट्यावरील संतगल्लीत घडली. घटनेतील दोघा भामट्यांचे गल्लीतल्या जवळच्या एका दुकानातील सीसीटीव्हीत चित्रीकरण झाल्याचे पोलिसांना सापडले असून त्याच्या आधारे या दोघांचा शोध सुरु आहे. सराफ फाट्यावर राहणाऱ्या मीना विजयकुमार सिसोदिया दुपारी आपल्या घरात असतांना त्यांच्या घराच्या व्हरांड्यात दोघे अज्ञात इसम आले व त्यांनी त्यांच्याकडील पॉलिश पावडरने तांब्याचा गडू पॉलिश करून दिला. गडू लख्ख झाल्याचे बघितल्याने त्यांनी पायातील चांदीच्या पट्ट्या काढून दिल्या. त्याही भामट्यांनी स्वच्छ करून दाखविल्या. त्यानंतर हातातील सोन्याच्या बांगड्याची सुध्दा साफ करून देतो असे म्हणून त्या घेतल्या. बांगड्या डब्यात टाकून सांगितल्याप्रमाणे मीनातार्इंनी डब्यातील पाणी गरम केले मात्र डबा उघडल्यावर त्यांच्या बांगड्या काही आढळून आल्या नाहीत, तोपर्यंत भामटे निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे बघून त्यांनी या अज्ञात भामट्यांचा सराफ फाट्यापर्यत पाठलाग केला. मात्र ते परागंदा झाले होते. त्यांच्या हालचाली जवळच्या अरविंद एन्टरप्राइजेस या दुकानाच्या सीसीटीव्हीत चित्रित झाल्या आहेत. त्याच्या आधारे या भामट्यांचा माग घेण्याचे काम पोलिस करीत आहेत.