झाडाझडती : संगीता काटे यांच्याकडून विभागप्रमुखांना कडक कारवाईच्या सूचना

By admin | Published: October 29, 2014 10:51 PM2014-10-29T22:51:11+5:302014-10-29T23:40:17+5:30

सिन्नर पंचायत समितीत आढळले ९ दांडीबहाद्दर

Jhadajadi: Instructions for strict action against the head of the department by Sangeeta Kate | झाडाझडती : संगीता काटे यांच्याकडून विभागप्रमुखांना कडक कारवाईच्या सूचना

झाडाझडती : संगीता काटे यांच्याकडून विभागप्रमुखांना कडक कारवाईच्या सूचना

Next

सिन्नर : पंचायत समितीच्या सभापती संगीता विजय काटे यांनी बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अचानक पंचायत समितीच्या प्रत्येक विभागाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांना शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचारी गैरहजर आढळून आले. खातेप्रमुखांकडून कोणतीही अधिकृत रजा न घेता परस्पर दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता, प्रचार, निवडणूक व मतमोजणी त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या यामुळे पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती संगीता काटे यांना पंचायत समितीच्या प्रत्येक विभागात जाण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे नवनिर्वाचित सभापती सौ. काटे यांचा खऱ्या अर्थाने आज कामकाजाचा पहिला दिवस ठरला. दिवाळीची सुटी संपल्यानंतर अनेक कर्मचारी परस्पर गैरहजर असल्याच्या तक्रारी सभापती सौ. काटे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. विविध कामांसाठी येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना अधिकारी व कर्मचारी न भेटल्यामुळे सोमवारपासून हेलपाटे मारण्याची वेळ येत होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सौ. काटे यांच्यासह पंचायत समिती सदस्य रामदास खुळे यांनी प्रत्येक विभागाची झाडाझडती घेतली.
पंचायत समितीचे कामकाज सुरू होण्याची सकाळी १० वाजेची वेळ आहे. साडेदहा वाजेच्या सुमारास सौ. काटे यांच्यासह सदस्य खुळे यांनी शिक्षण, कृषी, लघुपाटबंधारे, इमारत व दळणवळण, एकात्मिक बालविकास प्रकल्प, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, पशुवैद्यकीय, ग्रामपंचायत विभाग, प्रशासन, समाजकल्याण, सर्वशिक्षा अभियान आदिंसह सर्वच विभागात जाऊन कामकाजाची पाहणी केली. प्रत्येक विभागप्रमुखाकडे ठेवलेल्या हजेरीपत्रकात पाहणी केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या, तर काही कर्मचारी कामानिमित्ताने कार्यक्षेत्रात गेल्याचे सांगण्यात आले. मात्र अनेक विभागात हालचाल रजिस्टर आढळून आले नाही, तर काही विभागात असलेल्या हालचाल रजिस्टरवर कोणतीही नोंद नव्हती. नऊ कर्मचारी गैरहजर, दोन कर्मचारी दीर्घ रजेवर, तीन कर्मचारी प्रशिक्षणासाठी तर कार्यालयीन अधीक्षकांसह दोन अधिकारी भरती प्रक्रियेसाठी नाशिकला गेले होते. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.
सुमारे नऊ कर्मचारी रजा न घेता गैरहजर असल्याचे आढळून आले तर हालचाल रजिस्टरवर नोंद न करता कार्यक्षेत्रात कामावर गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली. विविध विभागात खुर्चीवर बसलेल्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते. त्यामुळे यापुढे प्रत्येक कर्मचाऱ्यांना यापुढे ओळखपत्र सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापुढे ओळखपत्र न बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना शंभर रुपये दंड ठोठावण्याचा इशारा सभापती सौ. काटे यांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: Jhadajadi: Instructions for strict action against the head of the department by Sangeeta Kate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.