नाशिकसह जव्हार, पालघरला भूकंपाचे सौम्य धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:22 AM2018-07-25T01:22:23+5:302018-07-25T01:23:08+5:30
नाशिक : नाशिकपासून जव्हार, पालघरच्या दिशेने सुमारे ८० ते ९० किलोमीटरच्या परिसरात मंगळवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास अवघ्या चार तासांत भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ८८ किलोमीटर असून, भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची तीव्रता २.४ ते २.९ रिश्टर स्केलच्या दरम्यान नोंदविण्यात आली आहे. भूकंपामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिकपासून जव्हार, पालघरच्या दिशेने सुमारे ८८ किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू असलेल्या भूकं पाचा पहिला धक्का सकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. तर ६ वाजून २० मिनिटांनी २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. तिसरा धक्का ९ वाजता २.७ रिश्टर स्केल आणि चौथा धक्का १० वाजून २० मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा जाणवला. जिल्हा प्रशासनाला याबाबतचा अहवाल प्राप्त झाला. नाशिक जिल्ह्णात जुलैमध्ये महिन्यात दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यापूर्वी १० जुलै रोजी पेठ तालुक्यातील भायगाव शिवारात सकाळी ७.४० ते ७.४५ दरम्यान २.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. गोंदे, हनुमंतपाडा व उस्थळे या भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने यंत्रणेची धावपळ उडाली होती. त्यानंतर १४ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी ३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने प्रशासनाने प्रारंभी पेठ, सुरगाणा, कळवण तालुक्यात याबाबत विचारणा केली. परंतु, संबंधित भागात धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तांत्रिक तज्ज्ञांकडून माहिती घेऊन या भूकंपाचा केंद्रबिंदू जव्हार, पालघरच्या दिशेने ८८ किमी अंतरावर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.