जिद्दीला सलाम : पोलीस शिपाई झाले पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न झाले साकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:38 AM2018-04-09T00:38:22+5:302018-04-09T00:38:22+5:30
नाशिक : नाशिक पोलीस दलात शिपाई असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.
नाशिक : नाशिक पोलीस दलात शिपाई असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश मिळवत अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. पुढील महिन्यात त्यांच्या अधिकारी पदाच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कमांडो राणा परदेशी आणि नाशिक शहर महिला पोलीस शाखेतील सविता गवांदे यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खाकीचे आकर्षण असल्यामुळे राणा प्रतापसिंग परदेशी या तरुणाने बी.कॉम झाल्यानंतर १ जून २०१० रोजी पोलीस भरतीच्या माध्यमातून पोलीस दलात प्रवेश केला. परंतु केवळ पोलीस शिपाई म्हणून सेवा करण्यापेक्षा खात्यातील मोठ्या पदापर्यंत जाण्याची त्यांची इच्छा असल्यामुळे परदेशी यांनी पोलीस दलातील अॅडव्हान्स प्रशिक्षण फोर्स-१ पोलीस कमांडो म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. २०१६ मध्ये एमपीएससीची परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षाही उत्तीर्ण झाले. त्यामुळे आता त्यांच्या डोक्यावर पी-कॅप येणार आहे. वडिलांचे सामाजिक कार्य आणि त्यांच्या कलागुणांचा आदर्श डोळ्यासमोर असल्यामुळे वडिलांप्रमाणेच नाव कमाविण्याची इच्छा राणा यांना होती. मूळ चांदवड तालुक्यातील हट्टी येथील प्रतापसिंग परदेशी यांनी पोटापाण्यासाठी नाशिक गाठले आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. वडिलांनंतर कुटुंबातील सर्व जबाबदारी राणा यांच्यावर आली. त्यातच आई नोकरीला असलेल्या ठिकाणी ब्रेक मिळाला. त्यामुळे राणा यांनी तुटपुंज्या वेतनावर मेडिकलमध्ये काम केले. या काळात मेव्हणे गणेश परदेशी यांची मोलाची साथ लाभली.
राणा यांनी मॉलमध्येही काम केले. हे सर्व करीत असताना पोलीस होण्याचे स्वप्न कायम होते. चांगली उंची, देखणा चेहरा, उत्कृष्ट देहबोली असल्यामुळे राणा यांना अनेकांनी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. मॉडेलिंग करीत असताना नाशिकमधीलच अनेक फॅशन्स शो मध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. पुढे मुंबई, पुण्यातही काहीकाळ मॉडेलिंग केले. अनेक नामवंत संस्थांसाठी राणा परदेशी यांनी मॉडेलिंग केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या राणा यांना आता प्रतीक्षा आहे ती पी-कॅप परिधान करण्याची.