जिगर... मित्राला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिली चक्क 'चंद्रावर 1 एकर जमीन'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:59 AM2022-02-09T07:59:26+5:302022-02-09T08:06:14+5:30
या जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी यांच्याकडे पूर्ण करण्यात आली. या नोंदणीच्या कागदपत्रांसोबतच जागेचा नकाशा व बोर्डीग पासदेखील त्यांना देण्यात आला आहे.
नाशिक - महाभारतातील श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यापासून शोले चित्रपटाच्या जय विरुपर्यंत मैत्रीचे अनेक उदाहरण आपल्याला दिले जाते. निस्वार्थी मैत्री कशी असावी, मैत्रीत गरीब-श्रीमंत कुणीही नसतो. म्हणूनच गरीब सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णाने चवीने खाल्ले होते, तर न मागताच आपल्या मित्राची झोळीही भरली होती. म्हणून रक्ताचं नसलं तरी मैत्रीचं नातं हे अनेकदा रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतं. आता, नाशिक जिल्ह्यातील दोन जिगरी दोस्तांच्या मैत्रीचं असंच उदाहरण समोर आलं आहे.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमालामधील ही मैत्री सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. त्याला, कारणही तसेच आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रुपेश हरिश्चंद्र नाठे यांस त्यांचा मित्र डॉ. हृषीकेश प्रदीप मुधळे आणि त्यांच्या कुटुंबाने थेट चंद्रावर १ एकर जमीन भेट स्वरुपात दिली आहे, निमित्त होते रुपेशच्या वाढदिवसाचे. या जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी यांच्याकडे पूर्ण करण्यात आली. या नोंदणीच्या कागदपत्रांसोबतच जागेचा नकाशा व बोर्डीग पासदेखील त्यांना देण्यात आला आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेत असलेले रूपेश नाठे यांनी गोंदे येथून महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती शिवरायांची पालखी सुरू केली. विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग बघून त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून ही अनोखी भेट दिल्याचं त्यांचे मित्र डॉ. मुधळे व कुटुंबाने सांगितलं.
सुशांतसिंह राजपूतनेही घेतल्याचे वृत्त
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतरही त्याने चंद्रावर जमीन विकत घेतल्याचे वृत्त समोर आले होते. यापूर्वीही चंद्रावर जमीन खरेदी करून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना भेट म्हणून भेट दिली होती. हे ऐकून, लोक चंद्रावर जमीन कशी खरेदी करतात?, असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो.
भेटवस्तू म्हणून अधिक वापर
आजकाल भेटवस्तू म्हणून चंद्रावरची जमीन देण्याचा ट्रेंड आहे आणि लोक त्यांच्या खास लोकांसाठी चंद्रावर जमीन खरेदी करत आहेत. अशा प्रकारे, बर्याच वेबसाईट्स चंद्राच्या नावावर पैसे घेऊन जमीन विकल्याचा दावा करतात आणि प्रमाणपत्रही देतात. ही केवळ एक भेटवस्तू आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, चंद्रावर जमीन खरेदी करणे म्हणजे एका कागदाच्या तुकड्यासाठी पुष्कळ पैसे देण्यासारखे आहे.
किती येतो खर्च
काही वेबसाईट्स चंद्रावर जमीन वेगवेगळ्या प्रकारे विकण्याचा दावा करतात. बर्याच वेबसाईटवर एकरानुसार चंद्रावरची जमीन विकली जाते. जर आपण त्या किंमतीबद्दल चर्चा केली तर, ही किंमत डॉलरमध्ये आहे आणि आपल्याला भारतीय चलनाऐवजी डॉलरनुसार पैसे द्यावे लागतील. बर्याच वेबसाईटवरील दर पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, या वेबसाईट्स प्रति एकर सुमारे 30 ते 40 डॉलर्सच्या भावाने जमिनीची कागदपत्रे देत आहेत. भारतीय चलनानुसार ही किंमत 2500च्या आसपास आहे. याचा अर्थ असा की आपण चंद्रावर एक एकर जमीन सुमारे 2500 रुपयांमध्ये खरेदी करू शकता