जिजाऊ ब्रिगेडने पाळला दुखवटा दिवस
By admin | Published: March 10, 2017 02:00 AM2017-03-10T02:00:55+5:302017-03-10T02:01:11+5:30
नाशिक : राज्यात महिला व बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मेणबत्ती पेटवून रॅली काढून दुखवटा दिवस पाळण्यात आला.
नाशिक : राज्यात महिला व बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मेणबत्ती पेटवून रॅली काढून दुखवटा दिवस पाळण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
ब्रिगेडच्या अध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी मेहेर चौकातून महिलांनी रॅली काढली. यावेळी प्रत्येक महिलेच्या हातात मेणबत्ती पेटविण्यात आली होती. आमदार परिचारक यांनी सैनिक पत्नी संदर्भात काढलेले अनुद्गार, म्हैसमाळ येथे भ्रूण हत्त्या, कोपर्डी घटना यांसारख्या महिला व बालिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, ग्रामीण भागात महिलांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, स्त्रियांना स्वसंरक्षणाच्या कोणत्याही योजना नाहीत, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण चिंताजनक असून, महिलांच्या आर्थिक विकासासाठी महामंडळे तुटपुंजे ठरत आहेत असे असताना महिला दिन कोणत्या आनंदाने साजरा करायचा? कोपर्डी घटनेतील आरोपींना अद्यापही शिक्षा झालेली नाही,
आमदार परिचारकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे असताना जिजाऊ ब्रिगेडने महिला दिन साजरा न करता, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहून दुखवटा पाळत असल्याचे म्हटले आहे.
या निवेदनावर ज्योती काथवटे, चैताली बेजेकर, वैशाली वाक््चौरे, कांचन सहाणे, अश्विनी पाटील, नमिता पाटील, वैभवी देसले, दीपाली डुमरे, विद्या गडाख, चंद्रप्रभा मावळे, अर्चना रायकर, अंकिता पाटील, अनुपमा मराठे, साधना देशमुख, मंजूषा व्यवहारे, जया राजे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.