नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:27 PM2019-10-14T22:27:27+5:302019-10-15T00:54:23+5:30
लष्करामध्ये नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून दोघा जणांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरी लावून देण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले असता बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : लष्करामध्ये नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून दोघा जणांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरी लावून देण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले असता बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर अशोकनगर येथील रवींद्र प्रताप बेचेनसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जुलै २०१८ मध्ये उत्तर प्रदेश आजमगढ येथे राहणारा शालकाचा मुलगा नितीशकुमार हा त्यांच्या घरी आला होता. आपल्या गावाकडील लल्लनसिंग यादव हे नाशिकला राहत असून,त्यांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. लष्करामध्ये स्टोअर किपर म्हणून नोकरी लावून देणार असून, त्याकरिता चार लाख रुपये द्यावे लागणार आहे. रवींद्र बेचेनसिंग हे शालकाचा मुलगा नितीशकुमार याच्यासोबत नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळील कैलास लॉज येथे लल्लनसिंग यास भेटण्यास गेले होते. यावेळी तेथे विद्याभास्कर तिवारी उपस्थित होते. लल्लनसिंगने नितीशकुमारचे कागदपत्र तपासून चार लाख रुपये दिल्यावर जॉइनिंग लेटर देण्यात येईल. देवळाली कॅम्पच्या एमईएस येथे कामावर हजर करून घेण्यात येईल, असे सांगितले. त्यावेळी रवींद्र प्रताप बेचेनसिंग यांचा लल्लनसिंग यादव यांच्यावर विश्वास बसल्याने मुलगा अंकितसिंग हा पदव्युत्तर असून, त्याला नोकरी मिळू शकते का म्हणून विचारणा केली. यावेळी लल्लनसिंग याने अपर डिव्हीजन क्लार्क या पदाची नोकरी लावून देतो त्याकरिता साडेचार लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानंतर २० दिवसांनी रवींद्र बेचेनसिंग व नितीशकुमार यांनी एकूण साडेआठ लाख रुपये दिले.
२५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत वारंवार लल्लनसिंग याच्याशी संपर्क साधला असता तो आश्वासन देऊन टाळू लागला. त्यानंतर संबंधितांनी लष्कराच्या कार्यालयात जाऊन जॉइनिंग लेटर दाखविले असता, अशी कुठलीही परीक्षा झालेली नाही. हे आमचे लेटर नाही असे सांगण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे रवींद्र बेचेनसिंग याने जानेवारी २०१९ मध्ये लल्लनसिंग याच्याकडे मुलाच्या नोकरीसाठी दिलेल्या पैशाची मागणी केली असता नाशिकरोड स्टेशनवर बोलविले. तेथे लल्लनसिंग यादव, विद्याभास्कर तिवारी, गौतम पगारे, बाबा सिंग यांनी शिवीगाळ व दमदाटी करून पैसे देणार नाही असे सांगितले. बाबा सिंग याने बंदुक रोखून पैसे देणार नाही काय करायचे ते करून घ्या, असा दम दिला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.