कॉँग्रेस भवनासमोर ‘जोडे मार’ आंदोलन
By admin | Published: May 27, 2015 01:01 AM2015-05-27T01:01:03+5:302015-05-27T01:01:26+5:30
कॉँग्रेस भवनासमोर ‘जोडे मार’ आंदोलन
नाशिक : वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने कॉँग्रेस भवनासमोर मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पोस्टर्सला चपलांची माळ घालून ‘जोडे मार’ आंदोलन करण्यात आले, यावेळी पोस्टर्स हिसकावण्यावरून पोलिसांशी कार्यकर्त्यांची चकमकही झाली. सकाळी ११ वाजता प्रारंभी माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली, त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कॉँग्रेस भवनासमोर ‘मोदी सरकारच्या पुण्यतिथी’चा कार्यक्रम घेतला. याठिकाणी छोटेखानी स्टेज उभारून त्यावर मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा फलक लावण्यात येऊन तेथेच आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात येऊन फलकावर जोडे मारण्यात आले तसेच आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पोस्टर्सला चपलांची माळ घालण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केल्यावर चकमक उडाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या ताब्यातील पोस्टर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला, यावेळी गोंधळ उडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून घोषणाबाजी केली व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, वंदना मनचंदा, लक्ष्मण मंडाले, अण्णा पाटील, राहुल दिवे, संजय पाटील, पांडुरंग बोडके, लक्ष्मण जायभावे, सुरेश आव्हाड, उद्धव पवार, वसंत ठाकूर, राजेंद्र बागुल, हनिफ बशीर, साखरचंद कांकरिया, भिवानंद काळे, सुरेश मारू, स्वप्नील पाटील, बबलू खैरे, आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)