जोगेश्वरी पॅनल विजयी
By admin | Published: October 15, 2016 12:09 AM2016-10-15T00:09:49+5:302016-10-15T00:18:24+5:30
जोगेश्वरी पॅनल विजयी
वडनेरभैरव : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व विद्यमान अध्यक्ष संपतराव वक्टे यांच्या जोगेश्वरी पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय संपादित केला आहे.
वक्टे यांनी सोसायटीवर तब्बल चौथ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. या निवडणुकीत जिल्हा राष्ट्रवादीचे
नेते बाळासाहेब माळी, पंचायत समिती माजी उपसभापती दिलीप धारराव यांच्या भैरवनाथ पॅनलचा पराभव झाला. वडनेरभैरव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. संपतराव वक्टे यांची गेल्या पंधरा वर्षापासून सोसायटीत सत्ता आहे.
यंदा सत्ता बदल होईल या अपेक्षेने विरोधकांनी मोर्चेबांधणी केली होती मात्र वक्टे यांनी जोरदार मुसंडी मारत सर्व जागा जिंकून आणल्या आहेत. या निवडणुकीत जिल्हा तसेच तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या पुढाऱ्यांना पराभव पत्कारावा लागला आहे.
निवडणुकीत विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते - संपतराव वक्टे (७९५), काकासाहेब भालेराव (६२९), विजय निखाडे (६९४), भाऊसाहेब पवार (७१३), कचरू सलादे (६४०), विलास शिंदे (७५१), वामनराव साळुंके (६०७) , राजाराम तिडके (७००), तुकाराम गांगुर्डे (७५७), मीराबाई पाचोरकर (७७४), इंदूबाई तिडके ( ७४८), सुभाष माळी (७२१), भारतसिंग परदेशी (७४६) हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद परदेशी यांनी मतमोजणीनंतर जाहीर केले. निवडणुकीनंतर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.(वार्ताहर)