जॉगिंग ट्रॅकने कात टाकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:15 PM2020-07-16T22:15:36+5:302020-07-17T00:09:30+5:30
इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. एकप्रकारे नूतनीकरणाने जॉगिंग ट्रॅकने कात टाकली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या ठिकाणी फारसे कोणी येत नसले तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत काही नागरिक फेरफटका मारताना दिसतात.
इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. एकप्रकारे नूतनीकरणाने जॉगिंग ट्रॅकने कात टाकली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या ठिकाणी फारसे कोणी येत नसले तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत काही नागरिक फेरफटका मारताना दिसतात.
इंदिरानगर परिसरात सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी संपूर्ण शेती होती, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून पाट बांधण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होत होता; परंतु जमिनीस चांगला दर मिळाला तशा जमिनी विकल्या. यानंतर पसिरात कॉलनी व सोसायट्या निर्माण झाल्या. पाण्याविना पाट पडून असल्याने त्या ठिकाणी काही नागरिक केरकचरा व बांधकामाचे नको असलेले साहित्य टाकत असल्याने घाण व दुर्गंधी निर्माण झाली होती. महापालिकेने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पाटचारी बुजवून त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक बनवला. त्यामुळे इंदिरानगर, विनयनगर, साईनाथनगर, दीपालीनगर, सूचितानगरसह परिसरातील आबालवृद्ध सकाळ व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येथे येतात. दरम्यानच्या काळात जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेतर्फे जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरणाचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. यामध्ये प्रभागील नगरसेवकांच्या सुमारे एक कोटी निधीमधून जॉगिंग ट्रॅकचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यावर विटांचे तुकडे टाकून आणि मुरूम टाकण्यात आला आहे, त्यानंतर पाणी मारून सपाटीकरण करण्यात येणार आहे . जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आकर्षक प्रवेशद्वारामुळे सौंदर्यात भर
सकाळी व सायंकाळी फेरफटका मारताना जॉगिंग ट्रॅकवर बसवलेले सुमारे ३६ स्पीकरमधून सूरमधुर गीते ऐकायला मिळतात. त्यामुळे परिसरात प्रसन्न वातावरणनिर्मिती होत असते. तसेच जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूस आकर्षक असे प्रवेशद्वार करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.