जॉन्स महाविद्यालयाने पटकावला ‘मविप्र करंडक’
By Admin | Published: January 14, 2015 11:56 PM2015-01-14T23:56:13+5:302015-01-14T23:57:04+5:30
जॉन्स महाविद्यालयाने पटकावला ‘मविप्र करंडक’
नाशिक : अत्यंत चुरशीच्या झालेल्या अखिल भारतीय वक्तृव स्पर्धेत आग्रा येथील सेंट जॉन्स महाविद्यालयाने बाजी मारत मविप्र करंडक पटकावला. याच महाविद्यालयाचा आनंदकुमार हा विद्यार्थी वैयक्तिक गटात प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी आज उत्तरोत्तर रंगली. अखेरच्या फेरीनंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी जॉन्स विद्यालय मविप्र करंडकाचे मानकरी ठरले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, नितीन ठाकरे, नाना महाले, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, परीक्षक प्रा. दिगंबर पाध्ये, डॉ. सुधीर पानसे, डॉ. एकनाथ पगार आदि मान्यवर उपस्थित होते. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व व विचार समृद्ध होतात. आपले विचार इतरांपर्यंत पोहचविणारी वक्तृत्व ही अत्यंत उत्कृष्ठ अशी कला असल्याचे पवार यांनी मनोगतातून सांगितले. दरम्यान, प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम २१०००, करंडक, सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रूपये रोख, व तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये रोख असे बक्षिसाचे स्वरूप होते.
या स्पर्धेत देशभरातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान, विविध सामाजिक, राजकिय व नैसर्गिक विषयांवर विद्यार्थ्यांनी भाष्य केले. तृतीय क्रमांक नागपूर येथील परशुराम भुवनेश्वरी महाविद्यालयाने राखण्यात यश मिळविले. उत्तेजनार्थ बक्षिसे हर्षाली घुले, बीवायके महाविद्यालयाची मुग्धा जोशी या विद्यार्थिनींनी पटकावली. अकराशे रुपये रोख, सन्मानपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप होते. (प्रतिनिधी)