‘त्या’ मजूरांच्या गावकडच्या प्रवासाला लाभली चाकांची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 03:45 PM2020-05-08T15:45:19+5:302020-05-08T15:48:29+5:30
नाशिकरोडचे समाजसेवक फ्रान्सिस वाघमारे हे नाशिकला सायकलवर जात असताना नाशिक-पुणे मार्गावरील नासर्डी पुलाजवळ पायी चाललेले सहा युवक पाच दिवसापूर्वी त्यांना दिसले.
नाशिक : सहाब, आप हमारे लिये किसी भगवानसे कम नहीं हो, आपने हमें साईकिल नहीं, इस लॉकडाउन के समय जैसे मानो प्लेनही दे दिया हों, हम जिंदगीभर आपके एहसानमंद रहेंगे..., अशा भावना मध्यप्रदेशमधील इंदोर सायकलींद्वारे गाठणाऱ्या त्या सहा मजूर युवकांनी व्यक्त केल्या.
पुण्याहून नाशिकमार्गे मध्यप्रदेशमधील कटनी जिल्ह्यात घरी पायी जाण्यास निघालेल्या युवकांना नाशिकरोड येथील सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सीस वाघमारे यांनी विद्यार्थी व त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने सायकली उपलब्ध करून दिल्या आणि त्या मोलमजूरी करत भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणा-या मजूरांच्या नाशिक ते मध्यप्रदेश या प्रवासाला चाकांची गती अखेर लाभली. हे मजूर पुण्याहून सुमारे दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत नाशिकरोडला आले होते.
कोरोनाच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अ़नेक परप्रांतीय बि-हाडासह पायीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करत गावी चालले आहेत. नाशिकरोडचे समाजसेवक फ्रान्सिस वाघमारे हे नाशिकला सायकलवर जात असताना नाशिक-पुणे मार्गावरील नासर्डी पुलाजवळ पायी चाललेले सहा युवक पाच दिवसापूर्वी त्यांना दिसले. भूक व तहानेमुळे व्याकुळ झालेल्या त्या युवकांना चालता देखील येत नव्हते. वाघमारे यांनी त्यांची विचारपूस ते मजूर युवक मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यातील रहिवासी असून पुण्याच्या चाकण येथे मोलमजूरीचे काम करत होते. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांची उपासमार सुरु झाल्यामुळे पायी प्रवासाला निघाले होते. पायपीट करत नाशिकला पोहचले. सुदैवाने वाघमारे यांनी मदतीचा हात पुढे केल्याने येथून पुढच्या त्यांच्या प्रवासाला चाकांची गती मिळाली.