न्यायाधीश हवेत गुणवत्तापूर्ण
By admin | Published: September 8, 2014 12:37 AM2014-09-08T00:37:54+5:302014-09-08T00:58:39+5:30
न्यायाधीश हवेत गुणवत्तापूर्ण
नाशिक : न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढविणे आवश्यक असून, ही संख्या वाढली तरच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना न्याय मिळू शकेल़ गुणवत्तापूर्ण न्यायाधीश मिळत नसल्याने न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांची अनेक पदे रिक्त आहेत़ यासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सुरू केलेल्या ‘ज्युडिशिअल सर्व्हिस अॅज ए करिअर’ या एक वर्षाच्या ट्रेनिंगमधून गुणवत्तापूर्ण न्यायाधीश तयार होतील़ न्यायाधीश पदावरून समाजाच्या सेवेची संधी मिळते, असे प्रतिपादन देशाचे अॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सी़ सिंग यांनी केले़
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये झालेल्या विभागीय ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ पुढे बोलताना सिंग म्हणाले की, न्यायव्यवस्थेची जबाबदारी महत्त्वाची असून, प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायव्यवस्थेला लक्ष घालावे लागते़ नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, समाजाची सेवा करण्याची संधी न्यायाधीशपदावरून मिळते. या संधीचा निवड झालेल्या वकिलांनी लाभ घेण्याचे आवाहनही सिंग यांनी केले़
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शास्त्रीय संगीत शिकणारा जसा नेहमी रियाज करतो त्याचप्रमाणे न्यायाधीश व वकिलांनी कायद्याचा नेहमी अभ्यास करणे गरजेचे आहे़ अॅड़ जयंत जायभावे यांनी सांगितले की, ढोल वाजविण्यापासून तर फाशीपर्यंतचे सर्व निर्णय न्यायव्यवस्थेला घ्यावे लागत असल्याने गुणवत्तापूर्ण न्यायाधीशांची आवश्यकता आहे़ न्यायाधीश होण्याची इच्छा व त्यादृष्टीने प्रयत्न करणाऱ्या नवोदित वकिलांची निवड करून त्यांना ‘कायद्याचा दृष्टिकोन व तरतुदीं’कडे कसे पाहावे याचे प्रशिक्षण यामधून दिले जाणार आहे़
यावेळी महाराष्ट्र व बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड़ आसिफ कुरेशी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष बळवंत जाधव, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील अॅड़ राजेंद्र घुमरे, माजी जिल्हा सरकारी वकील श्रीधर माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़ आभार अॅड़ अविनाश भिडे यांनी मानले़ यावेळी नाशिक जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसह ज्येष्ठ विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)