न्यायव्यवस्था सत्य शोधण्याची प्रक्रिया : जयंत जायभावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:42 AM2019-07-01T00:42:35+5:302019-07-01T00:42:52+5:30
सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही.
नाशिक : सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. परिणामी न्यायव्यवस्थेचा पाया दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे यांनी केले.
संवाद नाशिक या संस्थेच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात ‘न्याय मिळण्यास विलंब का होतो’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी जायभावे म्हणाले, यांत्रिक मानसिकतेतून कायद्याची निर्मिती जेव्हा होते तेव्हा समाजाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब प्रत्येक घटक व पेशामध्ये उमटते. नैतिक दृष्ट्या बघितले तर खटल्यांना विलंब का होतो, तर प्रामाणिकपणा कुठे तरी कमी पडत आहे, हे यामागील निश्चित कारण लक्षात येते. न्यायव्यवस्थेचा पाया कमकुवत होण्यास स्वार्थीवृत्तीने आपल्या पेशामध्ये काम करण्याची प्रवृत्तीच जबाबदार आहे. विलंबाशिवाय न्याय हवा असेल तर प्रत्येकाला ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदनुसार प्रामाणिक राहून पेशानुसार कर्तव्य पार पाडावे लागेल, असे जायभावे म्हणाले.
भारतीय न्यायव्यवस्थेत दिवाणी खटल्याचे वय २६ तर फौजदारी खटल्याचे वय २० वर्ष इतके आहे तर अनुक्रमे परदेशात अवघे ३ व ४ वर्षे इतकेच आहे. यावरून भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था लक्षात येते. त्यामुळे सर्वसामान्यांची मानसिकता ‘न्यायालयात जायला नको’, ‘न्यायालयात जायचे कशाला, पुढील तारीख घ्यायला’ अशी होते. वकिलांपासून पोलिसांपर्यंत प्रत्येकाने सत्य शोधण्याच्या प्रक्रि येत आपला सहभाग मानून आपल्या भूमिकेला न्याय दिल्यास न्यायव्यवस्था अधिकाधिक बळकट होण्यास वेळ लागणार नाही.