निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या मुदतवाढीवरुन जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 04:30 PM2020-05-22T16:30:25+5:302020-05-22T16:30:55+5:30
त्र्यंबकेश्वर : धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची मुदत २० मे २०२० रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन नियुक्तीबद्दल दोन गटात जुंपली असून सध्या कोरोनासारख्या संकट काळात नव्याने नियुक्त्या न करता आहे त्याच विश्वस्त मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली असताना अन्य एका गटाने या मुदतवाढीस विरोध दर्शविला आहे. त्यामुळे धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागून असणार आहे.
संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती २० मे २०१५ मध्ये झाली होती. पाच वर्षाची मुदत दि. २० मे २०२० रोजी संपुष्टात आली. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या नियुक्ती नव्याने करु न विद्यमान विश्वस्त मंडळास बरखास्त करावे अशी मागणी सहाय्यक धर्मदाय आयुक्त नाशिक विभाग यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य सुरेश शेठ कमानकर, बाळा साहेब काकड, मोहन जाधव, नितीन सातपुते, अमर ठोंबरे, प्रसाद देशमुख आदिंनी एका निवेदनाद्वारे केली आहे. एकीकडे एका गटाने मुदतवाढीस विरोध दर्शविला असतानाच संस्थानच्या विद्यमान विश्वस्त मंडळाने यापूर्वीच धर्मादाय आयुक्त मुंबई व धर्मादाय उपायुक्त नाशिक विभाग यांना निवेदन देत सध्याच्या कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात निवडणुका घेणे उचित नसल्याचे म्हटले आहे. यावर्षी दर महिन्याला भरणारी वारी उटीची तसेच पंढरपुर यात्रेसाठी जाणारा दिंडी पालखी सोहळा शासनाच्या आदेशाचा स्थगित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विश्वस्त मंडळाची नव्याने नियुक्ती करणे योग्य ठरणार नाही, असे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी म्हटले आहे.