२७ जूनची यूपीएससी पूर्व परीक्षा १० ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:24+5:302021-06-09T04:18:24+5:30
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून देशातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून ...
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून देशातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षाही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २७ जून रोजी ही परीक्षा होणार होती. पण आता ही परीक्षा १० ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून देशभरातील वेगवेगळ्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचाही समावेश आहे. ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १७ जून रोजी घेतली जाणार होती. यूपीएससीच्या नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेला आधीच उशीर झाला होता. आता पुन्हा कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली असून यूपीएससीने १० ऑक्टोबर ही नवी तारीख जाहीर केली आहे. दरम्यान, यापूर्वी एमपीएससीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी व विरोधी पक्षांनी नाशिक, पुणे, मुंबईसह राज्यभरात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. नाशिकमध्ये कॉलेज रोड येथील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी चौकात एबीव्हीपी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोनन केले होते. तर पंचवटीतील एका वाचनालयात विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाची प्रत जाळून निषेध व्यक्त केला होता.
इन्फो
१० ऑक्टोबरला परीक्षेचे नियोजन
देशात यापूर्वीही कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु, यूपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्यासोबत नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशनदेखील जारी करण्यात आले आहे. यूपीएससी परीक्षा २०२१ आणि भारतीय वन सेवा परीक्षा २०२१ साठी २४ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.