मागील वर्षीच्या तुलनेच जूनचा पंधरवडा कोरडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:27+5:302021-06-16T04:20:27+5:30
नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे आणि जूनमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला ...
नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे आणि जूनमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी वगळता दमदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने पंधरा दिवसांत केवळ ७६.८७ मि. मि. इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या पंधरवड्यात १४९.७५ मि.मि. इतका पाऊस नोंदला गेला होता.
यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला असला तरी जून महिन्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. मागील वर्षी १ ते १५ जून या कालावधीत पडलेल्या पावसाच्या तुलनेत यंदाचा सरासरी पाऊसदेखील कमी झाला आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरला जूनच्या पंधरवड्यातदेखील दमदार पाऊस होत असतो; परंतु यंदा या दोन्ही ठिकाणी फारसा पाऊस झालेला नाही. मागील वर्षी दुष्काळी तालुक्यांमध्येदेखील वरुणराजाची कृपा जूनमध्येच बरसली होती. परंतु यंदा जिल्ह्यात तुरळक पाऊस वगळता पावसाने अस्तित्व दाखविले नाही.
मागील वर्षी जूनच्या पंधरवड्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाच्या सरींचा वर्षाव सुरू होता. या कालावधीत १४.९७ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर यंदा याच कालावधीत अवघा ७.६८ टक्के इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जूनच्या सुरुवातीलाच पूरस्थिती हाताळण्याबाबतचे नियोजन केले आहे. मात्र यंदा जूनमध्ये फारसा पाऊस होऊ शकलेला नाही.
सुरगाणा तालुक्यात जूनमध्ये पडलेल्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने तेथे जिल्ह्यातील सर्वधिक नुकसान झाले आहे. पशुधन तसेच शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये सुरगाणा तालुक्यात १८८.३ मि.मि. पाऊस झाला. गतवर्षी येथे १५० मि.मि. असा चांगला पाऊस झाला होता. जूनचा पाऊस कमी झाला असला तरी पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील शेतपीकांचे नुकसान झाले आहे.
--इन्फो--
जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान
तालुके १ ते १५ जून २०२० १ ते १५ जून २०२१ (मि.मि)
नाशिक: १२९.२ ३५.८
इगतपुरी : ५५२.० २७६.०
दिंडोरी : ८२.० ३१.०
पेठ : १०५.२ १३४.८
त्र्यंबकेश्वर : १४३.० ८६.०
मालेगाव : १२७.० ८२.०
नांदगाव : ६३.० १०.०
चांदवड : ७६.० ५१.०
कळवण : १०८.० ३९.०
बागलाण : १५३.० ६६.०
सुरगाणा : १५०.५ १८८.३
देवळा : १४७.८ ३२.९
निफाड : ८१.०५ ५४.२
सिन्नर : २३५.० ५७.०
येवला : ९३.० ९.०
सरासरी : १४९.७५ ७६.८७