जूनचा पंधरवडा कोरडाच; प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:48 AM2018-06-18T00:48:43+5:302018-06-18T00:48:43+5:30
यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा नाशिककरांना प्रचंड प्रमाणात उन्हाचा तडाखा सहन करावा लागला; मात्र पावसाने अद्याप निराशा केली असून, मागील वर्षी १७ जूनपर्यंत १४५ मि.मी.पर्यंत पाऊस झाला होता; यंदा मात्र केवळ ४३ मि.मी. इतक्या पावसाची नोेंद झाली असून, चालू महिन्याचे दोन्ही आठवडे कोरडे गेले.
नाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा नाशिककरांना प्रचंड प्रमाणात उन्हाचा तडाखा सहन करावा लागला; मात्र पावसाने अद्याप निराशा केली असून, मागील वर्षी १७ जूनपर्यंत १४५ मि.मी.पर्यंत पाऊस झाला होता; यंदा मात्र केवळ ४३ मि.मी. इतक्या पावसाची नोेंद झाली असून, चालू महिन्याचे दोन्ही आठवडे कोरडे गेले. यावर्षी पावसाच्या हंगामाचा निराशाजनक प्रारंभ झाला आहे. यावर्षी वरुणराजाचे जोरदार आगमन होईल, असा अंदाज उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेकांकडून बांधला जात होता; मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसानेही दडी मारली.
मान्सूनचा प्रवेश झाल्याने अपेक्षा वाढल्या
अरबी समुद्रात मान्सून पोहचल्यानंतर अचानकपणे थांबला. उत्तर महाराष्टÑात मान्सूनचा प्रवेश दोन दिवसांपूर्वी झाला असला तरी अद्याप पाहिजे तशी दमदार हजेरी पावसाने लावलेली नाही. यामुळे यंदा जूनमध्ये पावसाने नाशिककरांची निराशाच केली असे म्हणणे वावगे ठरू नये. आठवडाभरापेक्षा अधिक दिवस शहर व परिसरात वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढल्याचे चित्र होते. यामुळे पावसावर त्याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. यापुढे वरुणराजाची कृपादृष्टी होईल आणि समाधानकारक असा पाऊस शहरासह जिल्ह्यात नाशिककरांना अनुभवयास येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. मान्सूनचा जिल्ह्यात प्रवेश झाल्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. २०१६ सालीदेखील पावसाने दडी मारली होती. जूनच्या दि. १९ तारखेला पहिल्या पावसाची हजेरी नाशिककरांनी अनुभवली होती. त्यावेळी ८ मि.मी. इतका पाऊस एका दिवसात झाला होता. २०१५मध्ये जून महिन्याच्या पंधरवड्यात पर्जन्यमानाची स्थिती जेमतेम राहिली होती. ३२ मि.मी.पर्यंत पाऊस त्यावेळी पंधरवड्यात झाला होता. मागील वर्षाचा अपवाद वगळता जूनच पंधरवडा सलग २०१५पासून कोरडाच गेल्याची स्थिती आकडेवाडीवरून स्पष्ट होते. कारण गेल्या वर्षी पंधरवड्यातच पर्जन्यमानाचे प्रमाण जवळपास दीडशे मि.मी.पर्यंत पोहचले होते. यावर्षी अद्याप पावसाने निराशाच केली असून, नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. अखेरच्या आठवड्यापर्यंत पावसाची सलग हजेरी सुरू होईल, अशी आशा नाशिककर बाळगून आहे.