कनिष्ठ अभियंत्यास गुलाबपुष्प देऊन ‘गांधीगिरी’
By admin | Published: September 28, 2016 12:51 AM2016-09-28T00:51:16+5:302016-09-28T00:51:54+5:30
इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव
इंदिरानगर : परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, वीजबिलही उशिरा मिळत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता सचिन मोहिते यांना गांधीगिरी मार्गाने गुलाबपुष्प देऊन विजेची समस्या सोडविण्याची मागणी केली.
इंदिरानगरमधील आदर्शनगर कॉलनी, शास्त्रीनगर, स्टेट बँक कॉलनी, एलआयसी कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, मानस कॉलनीसह परिसरात तीन महिन्यांपासून अनियमित स्वरूपात वीजपुरवठा होत असून, दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच कधीकधी सहा ते सात तास वीज गायब होत असल्याने परिसरातील नागरिक पुरते हैराण झाल्याने परिसरातील नागरिकांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठत आंदोलन केले. नागरिकांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत कनिष्ठ अभियंता सचिन मोहिते
यांना गुलाबपुष्प देऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.
यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे, मंगेश नागरे, मंगेश परदेशी, दर्शन साहनी, माणिक मेमाणे, पी. के. आव्हाड, अमित शार्दुल आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव, कमी दाबाने पाणी आणि पाइपलाइन फुटण्याचे प्रकार नेहमीच आणि सातत्याने घडत असतात. या संदर्भातील तक्रारीसाठी नेहमीच या कार्यालयाता चकरा मराव्या लागतात. मात्र येथील समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. पाणी आणि विजेच्या प्रश्नावर नागरिकांना नेहमीच आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागते. लोकप्रतिनिधींकडूनही नेहमीच हा मुद्दा विचारला जातो तरीही अधिकारी कामे करीत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. विजेच्या बाबतीही अलीकडे तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. मात्र दुर्लक्षच केले जात आहे. (वार्ताहर)