करवाढ रद्द निर्णयावरून भाजपातच द्वंद्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:05 AM2018-07-25T01:05:36+5:302018-07-25T01:05:50+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात निर्गमित केलेला आदेश रद्द करण्यावरून भाजपाअंतर्गतच जुंपली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे परस्पर विरोधी माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनी हात झटकले असून, हा पालकमंत्र्यांना अंधारात ठेवल्याप्रकरणी शहराध्यक्षांवर जबाबदारी लोटली आहे. दुसरीकडे करवाढ रद्द करण्याचा निर्णय आपण दिनकर पाटील यांना कधीही दिला नव्हता.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात निर्गमित केलेला आदेश रद्द करण्यावरून भाजपाअंतर्गतच जुंपली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे परस्पर विरोधी माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनी हात झटकले असून, हा पालकमंत्र्यांना अंधारात ठेवल्याप्रकरणी शहराध्यक्षांवर जबाबदारी लोटली आहे. दुसरीकडे करवाढ रद्द करण्याचा निर्णय आपण दिनकर पाटील यांना कधीही दिला नव्हता. आपण महापौर आणि गटनेत्यांशी चर्चा केली होती, असा दावा शहराध्यक्ष सानप यांनी मंगळवारी (दि.२४) केला आहे. स्थानिक भाजपातील गटबाजीमुळे त्रस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्यासारखा आयुक्त पाठविला. मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपाअंतर्गत विरोधी गट एकत्र आल्याचे दिल्याचे चित्र निर्माण झाले असताना करवाढीचा निर्णय पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून घेण्यात आल्याचे उघड होताच पुन्हा कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे वृत्त आहे. गेल्या १९ जुलैस करवाढ रद्द करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यावेळी सात ते आठ तास चाललेल्या महासभेत आयुक्तांच्या आदेशाच्या विरोधात १०५ नगरसेवकांनी भूमिका घेतली असली तरी तत्पूर्वी म्हणजे १४ जुलै रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मनपातील भाजपा पदाधिकारी आणि आयुक्तांची बैठक घेतली व त्यात भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. परंतु तत्पूर्वीच महासभा झाल्याने अखेरीस भाजपाने करवाढविरोधी निर्णय घेतला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता हा निर्णय झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्षांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सभागृहनेता दिनकर पाटील व गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त करून पालकमंत्री गिरीश महाजन, संघटनमंत्री किशोर काळकर यांना निवेदन पाठविले असून, त्यात म्हटल्यानुसार करवाढ रद्द करण्याचा निर्णय भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांचा आहे. आपण केवळ त्याचे पालन केले. महापालिकेतील सर्व निर्णय तेच घेत असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. करवाढ रद्दच्या विषयावर सभागृह नेतेच भूमिका बदलत असल्याने गोंधळाचे वातावरण आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मात्र हा निर्णय आपण घेतला. यात दुमत नाही. सभागृहात १०५ सदस्यांनी करवाढीच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे मी सभागृहाबरोबर रहात असल्याचे सांगितले, असे सानप म्हणाले.
पालकमंत्र्यांशी बोलणार
करवाढीच्या विषयावर मी पहिल्यापासून शेतकºयांबरोबर आहे. पालकमंत्र्यांनी आठ दिवसांत निर्णय देऊ, असे सांगितले असतानाही मध्येच महासभा घेण्यात आली. त्यामुळे करवाढीबाबत निर्णय घेणे भाग होते. महासभेत काय निर्णय घ्यायचा? असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा १०५ नगरसेवक विरोधात बोलल्याने निर्णय घेणे भाग होते. त्यानुसार मी, महापौर रंजना भानसी आणि गटनेता संभाजी मोरुस्कर यांच्याशी चर्चा केली. पाटील यांच्याशी चर्चा केली नव्हती. पालकमंत्र्यांशी करवाढ रद्दच्या निर्णयाबाबत अद्याप बोलणे झालेले नाही. त्यांच्याशी मी चर्चा करेल.
- बाळासाहेब सानप, आमदार