कारागृहात कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन
By admin | Published: December 9, 2015 12:19 AM2015-12-09T00:19:09+5:302015-12-09T00:20:11+5:30
नाशिकरोड कारागृह : २७00 संचित रजा अर्जांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील जवळपास २७०० कैद्यांनी संचित रजेच्या अर्जांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने व इतर विविध मागण्यांकरिता मंगळवारी सकाळपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
संचित रजेच्या प्रकरणाबरोबरच कैद्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. नातेवाइकांकडून कैद्यांसाठी आलेल्या वस्तू त्यांना वेळेवर दिल्या जात नाही. थंडीमुळे पांढऱ्या रंगाचेच स्वेटर वापरावे, उपाहारगृहातील भेसळयुक्त वस्तू मिळत असल्याने कैद्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
कारागृहातील २७०० हून अधिक कैद्यांनी मंगळवारी सकाळपासून अन्नत्याग उपोषण सुरू केल्याने कारागृह प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. कैद्यांच्या आंदोलनामुळे विविध वस्तू उत्पादन करणारे कारखानेदेखील बंद पडले होते. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी कैद्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळपर्यंत कैदी आपल्या अन्नत्याग उपोषणावर ठाम होते.