आमदाराच्या मंडळाचा डीजे लावून दणदणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:07 AM2018-09-25T01:07:51+5:302018-09-25T01:08:15+5:30
उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या तपोवन मित्रमंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्रीच्या सुमारास डीजेचा दणदणाट करून नियमाचे उल्लंघन केले़ या डीजेच्या दणदणाटावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व तुंबळ हाणामारीची घटनादेखील घडली़
नाशिक : उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या तपोवन मित्रमंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्रीच्या सुमारास डीजेचा दणदणाट करून नियमाचे उल्लंघन केले़ या डीजेच्या दणदणाटावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व तुंबळ हाणामारीची घटनादेखील घडली़ विशेष म्हणजे या डीजेच्या दणदणाटाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झालेली असतानाही पोलिसांनी मात्र डीजे नाही तर सूचना देण्यासाठी स्पीकर लावल्याचे सांगत आमदारांचा बचाव करण्याचा प्रयत्न चालविला असून, आडगाव पोलिसांनी अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल करून कर्तव्यबजावणीचे सोपस्कार पार पाडले आहेत़
भाजपाचे नगरसेवक तथा आमदारपुत्र मच्छिंद्र सानप यांच्या कृष्णनगर मित्रमंडळ, तपोवन कॉर्नर मित्रमंडळाने तपोवनात गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी एका स्टेजची उभारणी केली होती. या ठिकाणी गुलालाची मनसोक्त उधळण तसेच डीजेच्या तालावर मच्छिंद्र सानप यांनी ठेकाही धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़ रात्रीच्या सुमारास तपोवनात डीजेचा दणदणाट सुरू असताना नाचण्याच्या कारणावरून काही कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले, यामुळे एकच धावपळ होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ या हाणामारीच्या घटनेनंतर युवक घटनास्थळावरून फरार झाले़
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे़ या बंदीला न जुमानता आमदारांच्या मित्रमंडळाने हा दणदणाट केला आहे़ सानप हे सत्ताधारी पक्षाचे आमदार व त्यांचे पुत्र हे नगरसेवक असल्याने पोलीस प्रशासनही सानप यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. तपोवन परिसरात मंडळाने सूचना देण्यासाठी स्पीकर लावलेले होते तसेच गोंधळ घालणाºया अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल करून आडगाव पोलिसांनी आपले सोपस्कार पार पाडले आहेत़ विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डीजे लावून नाचण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही गुन्हा दाखल करताना डीजे सुरू असल्याचा कोणताही उल्लेख फिर्यादीत न करता पोलिसांनी आमदारांना पूर्णपणे अभय देण्याचे काम केल्याची चर्चा आहे़ राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात हे षडयंत्र असल्याचा पवित्रा आमदार बाळासाहेब सानप यांनी घेतला आहे़
पोलिसांची अजब न्यायपद्धती
गतवर्षी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावल्याने न्यायालयाचा अवमान केल्याचे सांगत पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक गजानन शेलार यांना अटक करण्यासाठी जंग-जंग पछाडले होते़ तसेच न्यायालयाकडून जामीन नामंजूर झाल्यानंतर शेलार यांना अटक करून मोठी मर्दुमकी गाजविल्याचा आविर्भावही पोलिसांनी दाखविला होता़ मात्र, आमदार व नगरसेवक सानप यांच्या मित्रमंडळाने डीजे दणदणाट करूनही त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता उलट चांगले सहकार्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे़ यामुळे पोलिसांच्या या अजब न्यायपद्धतीबाबत उलटसुलट चर्चा आहे़
बदनाम करण्याचा प्रयत्न
गत ३० ते ३५ वर्षांपासून राजकारणात असून आतापर्यंत गणेशोत्सवात कधीही मिरवणूक काढली नाही़ शांतता समितीचा सदस्य असून नियमांची पायमल्ली केलेली नाही़ राजकीय द्वेषापोटी मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे़
- बाळासाहेब सानप, आमदार