मालट्रकवर बस आदळली
By admin | Published: December 10, 2015 11:42 PM2015-12-10T23:42:33+5:302015-12-10T23:51:31+5:30
तारवाला चौकातील घटना : चौघे जखमी, बसचालक फरार; सिग्नल तोडल्याचा परिणाम
नाशिक : सकाळच्या सुमारास दिंडोरीकडून नाशिककडे येणाऱ्या महामंडळाच्या बसचालकाने तारवालानगर सिग्नलकडे दुर्लक्ष करून सिग्नल ‘रेड’ असतानाही बस पुढे दामटवण्याचा प्रयत्न केला. परिणामी रासबिहारी रस्त्यावरून येत असलेल्या मालट्रकवर बस जाऊन धडकल्याने गंभीर अपघात घडल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये महिला बस वाहकाचाही समावेश आहे.
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दिंडोरीकडून नाशिककडे जाणारी महामंडळाची बस (एमएच१४ बीटी ०७४२) भरधाव वेगाने तारवालानगर सिग्नलवर आली. यावेळी सिग्नल लागलेला होता; मात्र बसचालकाने ‘लाल दिव्या’कडे दुर्लक्ष क रत बस पुढे नेल्याने त्याचे नियंत्रण सुटले. दरम्यान, रासबिहारी रस्त्याने आलेल्या आयशर मालट्रकवर (जीजे १५ वाय वाय ३३७७) बस जाऊन धडकल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पेठरोड रस्त्याचा सिग्नल हिरवा असल्याने मालट्रक चौफुली ओलांडत होता. बसची धडक बसल्याने दुभाजकावर ट्रक पलटी झाला. यामध्ये हिरावाडीकडून पेठरोडकडे जाण्यासाठी झेब्राच्या आत सिग्नलच्या प्रतीक्षेत उभी असलेली चारचाकी मोटार (एमएच १५ ईएक्स ८४४) दाबली गेली. पंचवटी पोलिसांनी अपघातप्रकरणी बसचालकाला संशयित म्हणून जबाबदार धरले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा पोलीस रात्रीपर्यंत शोध घेत होते. बसवाहक सुरेखा महेंद्र विभांडिक (४०) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. (प्रतिनिधी)