फक्त तुमच्या फोटोपुढील दिवा मिणमिणतोय..
By admin | Published: October 31, 2016 01:54 AM2016-10-31T01:54:54+5:302016-10-31T02:07:04+5:30
.स्मरण शहिदांचे : दिवाळीच्या आनंदातही शहीद कुटुंबीयांच्या दु:खाची जाणीव; व्हॉटस् अपवर भावनिक लघुसंदेश
नाशिक : ‘दररोज आजूबाजूचा परिसर रोशनाईने उजळतोय, आपल्या घरी मात्र फक्त तुमच्या फोटोपुढील दीवा मिणमिणतोय. तुमच्या नसण्याने आमची दिवाळी अंधारमय झालीय.. बाबा, बघा ना दिवाळी आलीय...’ ‘शहिदांची दिवाळी’ या कवितेमधील या काही ओळी... एकीकडे शुभ दीपावलीच्या शुभेच्छा संदेशांची गर्दी सोशल मीडियावर होत असताना नरक चतुर्दशीच्या संध्येला ही कविताही व्हॉट्स अॅपच्या विविध ग्रुपमधून व्हायरल झाली आणि प्रत्येक भारतीयाने शहिदांना नमन केले.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेने यमसदनी धाडलेला बुरहान वाणी आणि त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढलेली अतिरेक्यांची घुसखोरी. अतिरेक्यांनी उरीच्या भारतीय लष्करी तळावर चोरट्या मार्गाने केलेला भ्याड हल्ला. या हल्ल्यात भारतमातेचे अठरा शूरवीर जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय सेनेने नियंत्रण रेषा ओलांडून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाईमार्गाने प्रवेश करून अतिरेक्यांच्या नेमक्या ठिकाणांना लक्ष्य करत ‘सर्जिकल स्ट्राईक’ची मोहीम फत्ते केली. पाक लष्कराकडून नापाक कुरघोड्या करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याने भारत-पाक या दोन्ही उभय देशांच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी पंतप्रधानांनी रविवारी (दि.३०) सकाळी भारतमातेच्या वीर जवानांना समर्पित केली. ‘देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी या बहादूर जवानांना समर्पित करू,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली.
देशात सुरू असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नियंत्रण रेषेवर देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावून देशाची सुरक्षा करत असलेल्या जवानांचा विशेष उल्लेख केला.
भारतीयांनी दिवाळीच्या आनंदात देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या जवानांचा विसर पडू दिला नाही. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येपासून भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त करत शहिदांना अभिवादन करण्यात आले.