अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:42 AM2019-07-22T00:42:35+5:302019-07-22T00:42:53+5:30
पंढरपूरच्या विठ्ठलाला आळवणाऱ्या स्वरांसह नृत्यातून जणू नाचे पांडुरंग अशी अनुभूती देणाºया भक्तिपूर्ण कार्यक्रमात नाशिककरही दंग झाले. ते ‘नामाचा गजर’ या संगीत संध्येच्या निमित्ताने.
नाशिक : पंढरपूरच्या विठ्ठलाला आळवणाऱ्या स्वरांसह नृत्यातून जणू नाचे पांडुरंग अशी अनुभूती देणाºया भक्तिपूर्ण कार्यक्रमात नाशिककरही दंग झाले. ते ‘नामाचा गजर’ या संगीत संध्येच्या निमित्ताने.
क. का. वाघ कला अकादमीच्या वतीने कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृतिनिमित्त ४९वे पुष्प परशुराम सायखेडकर नाट्यगृहात पार पडले. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या कार्यक्र मात अभंग आणि नृत्यातून विठ्ठलाची आळवणी करण्यात आली. या भक्तिरसाला किशोर पाठक यांचे निरूपण लाभले़
कार्यक्रमाचा प्रारंभ ‘जय जय रामकृष्ण हरी’ या नामगजराने झाली. त्यानंतर सुमुखी अथनी यांचे भजनावर आधारित नृत्याने पंढरपूरच्या वाळवंटावर आपण असल्याची अनुभूती झाली. शिल्पा देशमुख यांनी भीमसेन जोशी यांचे कन्नड भाषेतील भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या महालक्ष्मी स्तुतीपर कवनावर आणि राजस सुकुमार या गाण्यावर पदन्यास केला, तर सुमुखी अथनी यांनी सुंदर ते ध्यान, रु णुझुणू रु णुझुणू रे या अभंगावर नृत्य सादर केले. पुण्याच्या गायिका सानिया पाटणकर यांनी आपल्या द्रुत लयीतील रागदारीवर आधारीत रूप पाहता लोचनी हा अभंग सादर करताना पंढरपूरच्या वाळवंटावरील संतांचा मेळा डोळ्यासमोर उभा केला. गायक पं. मकरंद हिंगणे यांनी चोखामेळा यांचा आम्हा न कळे ज्ञान, अवघे गर्जे पंढरपूर, संत भार पंढरीत हे अभंग सादर केले. आनंद अत्रे यांनी जन्मोजन्मी आम्ही ही रचना सादर केली. कार्यक्र माच्या सुरु वातीला बाळासाहेब मगर, सुनील देशपांडे आणि राजेंद्र ओढेकर यांनी दीपप्रज्वलन केले. गायकांना नितीन पवार आणि सुजित काळे यांनी तबल्यावर, तर राजेश्री धुमाळ यांनी संगीतसाथ केली.