अवघ्या दोन तासांत उडाला विजयाचा गुलाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:17 AM2021-01-19T04:17:59+5:302021-01-19T04:17:59+5:30
नाशिक: जिल्ह्यातील ६६५ ग्रामपंचायतीची तालुकापातळीवर मतमोजणी सुरू झाल्यानंतर कमी सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा पहिला निकाल अवघ्या दोन तासांतच आल्याने ...
नाशिक: जिल्ह्यातील ६६५ ग्रामपंचायतीची तालुकापातळीवर मतमोजणी सुरू झाल्यानंतर कमी सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा पहिला निकाल अवघ्या दोन तासांतच आल्याने अनेक तालुक्यांमध्ये विजयाचा गुलाल उडाला. दुपारी चार वाजेपर्यंत जवळपास सर्वच ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट झाले होते. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असली, तरी सकाळी नऊ वाजेपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी कक्षाबाहेर गर्दी केली होती.
जिल्ह्यातील ६६५ ग्रामपंचायतींमधील ११ हजार ५६ जागांसाठी गेल्या शुक्रवारी १,९५२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सोमवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेपासून जिल्ह्यातील १३ ठिकाणी मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली. नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण आणि देवळा या तालुक्यांमधील केेंद्रांवर १४२ टेबल्सवर ७४० मतमोजणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
कमीत कमी ७ तर जास्तीतजास्त १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचातींची मतमोजणी सकाळी सुरू झाल्यानंतर, दुपारी बारा वाजेपर्यंत कमी सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. त्र्यंबेश्वरच्या अवघ्या तीन ग्रामपंचायतींमधील ९ प्रभागांमध्ये २१ उमेदवार रिंगणात होते. अवघ्या एका टेबलावर ४ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केली. त्यामुळे पहिल्या दोन तासांच्या आतच त्र्यंबकेश्वरमधून पहिला निकाल हाती आला.
त्यानंतर टप्प्याटप्याने निवडणुकीचे निकाल हाती आले. जसजसे निकाल जाहिर झाले, तसतसा मतदान केंद्राबाहेरच उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. काही ठिकाणी मतदानावर आक्षेप घेण्याच्या प्रकारातून वादावादीचे प्रसंगही उद्भवले. त्यामुळे पेालिसांना गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. मतमोजणी केंद्रात कुठेही तांत्रिक बिघाड, तसेच आक्षेपाची नोंद झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. उमेदवार आणि त्यांना पडलेली मते याबाबत ध्वनिक्षेपकांवरून माहिती देण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत हाेता.
तालुकापातळीवर ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्रे होती, त्या परिसरात सकाळापासूनच कार्ककर्ते वाहनांमधून आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोकळ्या मैदानावरही सर्वत्र चारचाकी आणि दुचाकी वाहने दिसत होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
--कोट--
सर्व तालुक्यांमध्ये मतमेाजणी शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकाार घडलेला नाही वा मतमोजणी बाबतही कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.