त्र्यंबकेश्वरी ऑक्सिजन प्रकल्पाची नुसतीच हवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:51+5:302021-06-05T04:10:51+5:30
त्र्यंबकेश्वर शहरात रुग्णसंख्या वेगाने घटते आहे. मात्र, तज्ज्ञांनी संभाव्य तिसऱ्या लाटेची भयानकता स्पष्ट केल्याने त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज ...
त्र्यंबकेश्वर शहरात रुग्णसंख्या वेगाने घटते आहे. मात्र, तज्ज्ञांनी संभाव्य तिसऱ्या लाटेची भयानकता स्पष्ट केल्याने त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभेही राहत आहेत. दीड महिन्यापूर्वी आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर येथील शिवप्रसाद हाॅलमध्ये तसेच घोटी व हरसूल येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्चाची घोषणा केली होती, तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, या प्रकल्पाच्या उभारणीबाबत अद्याप कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याने भविष्यात ऑक्सिजनची गरज कशी भागवली जाणार, या भयाने त्र्यंबकवासीयांना पछाडले आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांचा ऑक्सिजनअभावी बळी गेले. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला. त्यात गावकऱ्यांनी पाळलेला जनता कर्फ्यू, शासनाने लागू केलेले कडक निर्बंध यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात आता अवघे २ ते ३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर तालुक्यात १० ते १२ रुग्ण संख्या आहे.
येत्या काही दिवसांत शहर कोरोनामुक्त होईल, परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कसलीही उपाययोजना केली जात असल्याचे दृष्टिपथास येत नाही.
इन्फो
आमदार म्हणतात, चर्चा करतो!
आमदार हिरामण खोसकर यांच्याशी ऑक्सिजन प्रकल्पाबाबत संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शवत जिल्हा शल्य चिकित्सकांशी याबाबत चर्चा करतो, असे सांगितले. त्र्यंबकेश्वर देवस्थानकडूनही त्याबाबत काहीच हालचाली होताना दिसून येत नाही. याशिवाय देणगीदाखल आलेले ऑक्सिजन सिलिंडर्स, बेड्स आदी साहित्य आरोग्य विभागातर्फे प्रस्तावित आहे.
परंतु त्याबाबत अद्याप निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे सदर काम कधी पूर्ण होणार याबाबत साशंकता वाढली आहे.