न्यायमुर्ती सी.एल.थुल : तीन दिवसांत कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 04:01 PM2020-01-16T16:01:04+5:302020-01-16T16:08:10+5:30
कायदेशीर प्रक्रिया तीन दिवसांत पूर्ण करून त्याची माहिती आयोगाला सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना दिले आहेत, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी दिली.
नाशिक : दरी-मातोरी शिवारातील शिवगंगा फार्महाउसमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. पीडित तरुणांशी विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. या गुन्ह्यातील संशयित मुख्य सूत्रधार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यासह दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याशी संबंधित जाबजबाब व साक्षीदारांची साक्ष आदी सर्व कायदेशीर प्रक्रिया तीन दिवसांत पूर्ण करून त्याची माहिती आयोगाला सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना दिले आहेत, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी दिली.
सराईत गुन्हेगार संशयित संदेश काजळे याच्या वाढदिवसानिमित्त फार्महाउसमध्ये रंगविलेल्या ओल्या पार्टीत दोघा डीजे आॅपरेटर तरुणांना अमानुष मारहाण व अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराची घटना आठवडाभरापूर्वी घडली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले. ग्रामीण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाला गती देत आठवडाभरात म्होरक्या संदेश सूर्यकांत काजळेसह त्याच्या दहा साथीदारांना अटक केली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.१६) थूल यांनी शहराचा दौरा केला. त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा करत पीडित युवकांची कक्षात जाऊन भेट घेत जखमांची पाहणी केली. या प्रकरणाला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचेही थूल म्हणाले.
आयोगाचे तपासावर लक्ष
आयोग या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. सिंह यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ दोषारोपपत्र तयार करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्याच्या पोलीस दप्तरातील सर्व नोंदी व घडलेल्या प्रकारानुसार पोलिसांनी लावलेल्या कलमांचा बारकाईने अभ्यास केला आहे. तीन दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून साक्षीदार नंतर बदलून पडणार नाही, असेही थूल यांनी विश्रामगृहातील बैठकीत पोलिसांना सांगितले. पीडित व्यक्तींची रुग्णालयात भेट घेणाऱ्यांची गर्दी नियंत्रणात आणावी, तेथे पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशा सूचना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना या बैठकीत त्यांनी केल्या.
आर्थिक मदत मिळणार
पीडित कुटुंबीयांना समाजकल्याण विभागाकडून शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लवकरच शासनाकडे अहवाल पाठविला जाईल. दोघा कुटुंबीयांना मदत व निष्णात सरकारी वकील मिळेल, असेही थूल म्हणाले.