न्या. रानडे यांच्या निफाड येथील राष्ट्रीय स्मारकास चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:28 IST2021-01-21T19:23:49+5:302021-01-22T00:28:25+5:30
निफाड : थोर समाजसुधारक न्या. महादेव गोविंद रानडे यांचे जन्मगाव असलेल्या निफाड येथे त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी न्या. रानडे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे येथील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यालयात संपन्न झाली.

न्या. रानडे यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी दीपक टिळक, परशुराम परांजपे, डॉ. गो. ब. देगलुरकर, डॉ. सुषमा जोग, ॲड. अविनाश चाफेकर, वि. दा व्यवहारे आदी.
निफाड : थोर समाजसुधारक न्या. महादेव गोविंद रानडे यांचे जन्मगाव असलेल्या निफाड येथे त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी न्या. रानडे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे येथील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यालयात संपन्न झाली.
बैठकीसाठी ग्रंथोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वक्तृत्वात्तेजक सभा, पुणे सेवा सदन, प्रार्थना समाज, पुणे सार्वजनिक सभा या संस्थांचे प्रतिनिधी दीपक टिळक, ॲड. अविनाश चाफेकर, डॉ. गो. ब. देगलुरकर, परशुराम परांजपे, विद्याधर नादगोलकर, चिंतामणी पटवर्धन, डॉ. सुषमा जोग, मंदार बेडेकर, डॉ. दिलीप जोग आदी प्रतिनिधी उपस्थित होते, तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने या संस्थेचे संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, योग शिक्षक सुभाष खाटेकर उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रंथोत्तेजक सभेचे सहकार्यवाह ॲड. अविनाश चाफेकर म्हणाले की, न्या. रानडे ज्ञानाचे उपासक होते. समाजाची बौद्धिक उंची वाढावी हा त्यांचा ध्यास होता. ते ज्या गावी जात तेथे ग्रंथालय सुरू करीत. न्या. रानडे यांच्या जीवनचरित्राची नव्या पिढीला ओळख होण्यासाठी त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड या जन्मगावी त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे याकरिता भारत सरकार, राज्य सरकार यांच्याकडेही प्रयत्न करावेत व यासाठी लागणारा निधी फंडाच्या धर्तीवर उभारला जावा, असे चाफेकर यांनी स्पष्ट केले. वि. दा. व्यवहारे यांनी न्या. रानडे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रसार करता येईल, असे सांगितले.
न्या. रानडे यांना आदरांजली
बैठकीनंतर न्या. रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक विद्यापीठाचे कुलपती दीपक टिळक होते. याप्रसंगी डॉ. गो. ब. देगलुरकर यांचे ह्यन्या. रानडे यांचे जीवनकार्यह्ण या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. दिलीप जोग यांनी आभार मानले.