ज्यूससाठी बाटली; पावभाजीला डबा परिणाम प्लॅस्टिक बंदीचा : किराणा घेण्याचीही अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:58 AM2018-04-04T00:58:42+5:302018-04-04T00:58:42+5:30
: गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी करण्यात आल्यामुळे दैनंदिन व्यवहारात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी करण्यात आल्यामुळे दैनंदिन व्यवहारात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांप्रमाणेच दुकानदारांच्या व्यवसायावरदेखील परिणाम झाला आहे. बाजारात जाणाऱ्या प्रत्येकाला रोजच नवनवीन अडचणींना सामोरे जावे लागत असून, दैनंदिन व्यवहारात अडचणी वाढल्या आहेत. दुकानदार आता ग्राहकांकडे स्टीलचा डबा किंवा कापडी पिशवी आणली आहे का? अशी विचारणा करू लागले आहेत. शहरात पार्सल पॉँइंटची संख्यादेखील मोठी आहे. या दुकानदारांकडे हवाबंद डबा असला तरी ते घेऊन जाण्यासाठी कॅरिबॅग दिली जात नाही. त्यामुळे पार्सलचे हे डबे घेऊन जाणाºयांची मोठी कसरत होते. कामावरून घरी जाताजाता रस्त्यात भाजीपाला किंवा फळे दिसल्यानंतर अनेक लोक आवर्जून खरेदी करतात. करिबॅग गाडीला लावली की काम होत होते. परंतु आता कापडी पिशवी असेल तर घराकडे काहीतरी घेऊन जाता येते. त्यामुळे नोकरदार वर्गाचीही अडचण वाढली आहे. काही ठिकाणी विक्रेत्यांनी कागदाचे पाकिटे ठेवली आहेत, परंतु पेपरच्या पिशव्या जास्त वजन धरत नसल्याने त्या लगेचच फाटत असल्याचे प्रकारही घडू लागले आहेत. भाजीपाला खरेदी करणाºयांनादेखील आता कापडी पिशवी घेऊनच बाजारात जावे लागत आहे. शहरात वडापावच्या व्यवसायात सर्वांत मोठी आर्थिक उलाढाल होते. शहरामध्ये पावलोपाऊली वडापावच्या गाड्या आणि दुकाने असून, या व्यवसायात स्पर्धादेखील वाढली आहे. वडापाव, पाववडा, समोसा आणि भजी खवय्यांची संख्या काही कमी नाही. हे पदार्थ खाण्याबरोबरच अनेक ग्राहक पार्सल घेऊन जातात. परंतु आता त्यांना पार्सल नेणे कठीण झाले आहे. प्लॅस्टिक पिशवी नसल्याने आता वडापावचे पार्सल मिळणे कठीण झाले आहे. हीच बाब पावभाजी आणि मिसळ पार्सलच्या बाबतीतही झाली आहे. दुकानदार ग्राहकांना घरून स्टीलचा डबा आणावयास सांगत आहे. दारोदारी इडली-वडा विकणाºयांनादेखील प्लॅस्टिक पिशवी वापरता येत नसल्याने ते ग्राहकांकडे भांड्याची मागणी करीत आहेत. उन्हाळ्यामुळे चौकाचौकांतील ‘मॅँगो ज्यूस’ सेंटरवालेही पार्सल देण्यास मनाई करू लागले आहेत. प्लॅस्टिकची बॉटल असेल तर त्यांना बॉटलमध्ये मॅँगो ज्यूस दिला जात आहे.