भोकणीच्या सरपंचपदी ज्योती वाघ विजयी
By Admin | Published: June 15, 2016 10:05 PM2016-06-15T22:05:32+5:302016-06-15T23:22:06+5:30
भोकणीच्या सरपंचपदी ज्योती वाघ विजयी
सिन्नर : तालुक्यातील भोकणीच्या सरपंचपदी सिन्नर कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती अरुण वाघ यांच्या पत्नी ज्योती वाघ यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी भोकणी ग्रामपंचायतीची सरपंच निवड झाली होती. त्यावेळी वाघ यांच्या गटाने सोनाली साबळे यांना सरपंचपदाची संधी दिली होती. गेल्या महिन्यात साबळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी मंडल अधिकारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा घेण्यात
आली.
सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ज्योती वाघ व भारती अण्णासाहेब सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. वाघ यांच्या अर्जावर सूचक म्हणून उपसरपंच शरद साबळे
यांनी, तर श्रीमती सानप यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून रंगनाथ सानप यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत कोणीही माघार न घेतल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या ज्योती वाघ यांना पाच, तर भारती सानप यांना चार मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकारी देशमुख यांनी सरपंचपदी ज्योती वाघ यांच्या नावाची घोषणा केली.
ज्येती वाघ यांची सरपंचपदी निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच ज्योती वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोनाली साबळे, भिवाजी कुऱ्हाडे, शोभा कुऱ्हाडे, बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, सखाराम कुऱ्हाडे, साहेबराव साबळे, कांताराम कुऱ्हाडे, राजेंद्र वाघ, शिवाजी कुऱ्हाडे, अण्णा साबळे, अण्णा डावखर, मोतीराम नन्नावरे, निवृत्ती रणशेवरे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)