'बम-बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमली शिवमंदिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:02 PM2018-08-27T17:02:46+5:302018-08-27T17:10:13+5:30
नाशिक : तीसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...,’ ‘बम बम भोले...,’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. आज तीसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी मनोभावे शिवमंदिरात हजेरी लावून शिवपिंडीवर श्रीफळ व बेलाची पाने अर्पण करून दर्शन घेतले. गंगापूर शिवारातील जुन्या प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून, भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले होते. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची आख्यायिका आहे. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिरांमध्ये दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची पावले वळल्याने गाभा-यापुढे रांगा लागल्या होत्या.
सकाळी मंदिरात महाभिषेक करण्यात आला. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त भीमराव पाटील, बापूसाहेब गायकर, राहुल बर्वे, बाळासाहेब लांबे, अविनाश पाटील, देवेंद्र भुतडा आदी उपस्थित होते. शहरातील पंचवटी परिसरातील रामकुंडाजवळ असलेले कपालेश्वर महादेव मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे. नंदी नसलेले एकमेव महादेव मंदिर म्हणून कपालेश्वरची ओळख आहे. सोमवारी पहाटे भाविकांसाठी कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.
कपालेश्वर मंदिरातील पुजारींनीसाकाळी पिंडीला रु द्राभिषेक करुनमहादेवाच्या पिंडीचे विधिवत पूजन व महाआरती केली. तिसरा सकाळपासूनच शेकडो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या.भाविकांचीगर्दी लक्षातघेता दक्षिण दरवाजाने प्रवेश वउत्तर दरवाजाने बाहेर जाण्याचीव्यवस्था केली होती. मुख्य मंदिराच्या गाभा-यामध्ये विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती.
महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची पालखी
सोमवारी सायंकाळी कपालेश्वर मंदिरातून महादेवाच्या चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी सजवलेल्या पालखीत महादेवाचा पंचमुखी मुखवटा ठेवण्यात येतो व पालखी अग्रभागी असते. पालखीपुढे ढोल, ताशा वादक असतात तसेच शंखध्वनीचाही निनाद केला जातो. कपालेश्वर मंदिरातून पालखी अंबिका चौक, मालवीय चौक, शिनचौक, काळाराम मंदिर, सरदारचौक, साईबाबा मंदिर रस्त्याने काढण्यात येऊन रामकुंड येथे पालखीचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. लवकरच मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. कपालेश्वर मंदिरात महाआरतीने पालखी समारोप करण्यात येणार आहे.