प्रो- लीगमुळे कबड्डी झाली ‘वर्ल्डक्लास’
By admin | Published: September 10, 2014 09:44 PM2014-09-10T21:44:18+5:302014-09-13T00:57:42+5:30
प्रो- लीगमुळे कबड्डी झाली ‘वर्ल्डक्लास’
क्रि केट आयपीलच्या धर्तीवर प्रो कबड्डीची आखणी केली गेली. संघ विकले गेले. खेळाडूंचा लिलाव झाला. सामन्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी स्टार स्पोर्ट्सशी करार केला गेला. तब्बल १६ कॅमेऱ्यांसहित या सामन्यांचे प्रक्षेपण केले गेले आणि तब्बल ५० कोटी लोकांनी ही संपूर्ण स्पर्धा पाहिली. टीआरपीचे सर्व विक्र म मोडीत निघले. कबड्डीच्या अॅक्शन रिप्लेपासून ते तिसऱ्या पंचांपर्यंत सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान या स्पर्धेत वापरलं गेलं. अभिषेक बच्चनच्या मालकीच्या जयपूर पिंक पँथरने यू मुंबा संघाचा ३५-२४ असा पराभव करत पहिली-वहिली प्रो कबड्डी स्पर्धा जिंकली, अन् कबड्डी वर्ल्ड क्लास झाल्याची सर्वधुर चर्चा रंगु लागली आहे. मराठमोळ्या मातीत बहरलेला कबड्डीचा दम प्रो-लीगमुळे खऱ्या अर्थाने दिशादिशांना घुमत आहे. एकेकाळी राजकारण्यांची बटीक बनलेल्या कबड्डीला तिच्यातील व्यावसायिकतेची ताकद चारू शर्मा नामक क्र ीडा समीक्षकाने दाखवून दिली. त्यामुळेच कबड्डी बघता बघता फुटबॉल आणि क्रि केटपेक्षा लोकप्रिय झाल्याचे पहिल्यावहिल्या प्रो-लीगमुळे स्पष्ट झाले आहे. कबड्डीला वाईट दिवस म्हणणारे आता ‘कबड्डी’ या खेळात करीअर करण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. प्रो-लीगमुळे कबड्डीला प्राप्त झालेल्या ग्लॅमरची भल्याभल्यांना भुरळ पडली आहे. प्रो-लीगच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ विचार-विमर्शच्या व्यासपिठावर जिल्ह्यातील क्रीडा प्रशिक्षक व कबड्डीपटूंशी ‘कबड्डीची वाटचाल’ या विषयावर केलेल्या चर्चेचा हा गोषवारा...
नुकतीच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सांगली येथे प्रो-लीग कबड्डी स्पर्धा झाली. त्याला सिनेअभिनेते, देशातील आघाडीच्या उद्योगपतींनी क्रि केट लीगप्रमाणे कबड्डीतही लीग सामने खेळवून प्रायोजकत्वाची मोठी भूमिका पार पाडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कबड्डीला एकप्रकारे नवसंजीवनीच मिळाल्याची भावना क्रीडा प्रशिक्षकांसह कबड्डीपटूंमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत प्रशिक्षक प्रशांत भाबड यांनी सांगितले की, मराठमोळया मातीत बहरलेल्या कबड्डीची किर्ती पूर्वीच कबड्डीमहर्षी बुवा ऊर्फ शंकरराव साळवी यांनी सातासमुद्रापार पोहचविली. त्यामुळे कबड्डी हा खेळ नेहमीच आॅल टाईम फेव्हरेट राहिलेला आहे. मात्र या खेळाला क्रिकेट अथवा फुटबॉलप्रमाणे योग्य प्रसिद्ध मिळत नसल्याने कबड्डी खितपत पडली असल्याची चर्चा होत होती. मात्र प्रो-कबड्डी लीगमुळे या चर्चांना देखील पुर्णविराम बसला असून, कबड्डी आता वर्ल्डक्लास झाली आहे असेच म्हणावे लागेल. प्रो-लीगमुळे कबड्डी या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले असले तरी तशा दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे आव्हान आता असेल. मुळात कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात सर्वाधिक खेळला जातो. त्यामुळे तेथील खेळाडूला घडविण्याच्या दृष्टीने पुरेसे प्रयत्न होणे आवश्यक आहेत. केवळ कबड्डी वर्ल्डक्लास झाली किंवा प्रो-लीगमुळे कबड्डीला नवसंजीवणी मिळाली असे म्हणून चालणार नाही, तर कबड्डीचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तशा पद्धतीचे खेळाडू घडविण्याची जबाबदारी प्रशिक्षकांवर असेल. कारण आता कबड्डीची ही घौडदौड केवळ प्रो-लीगपुरतीच मर्यादीत न ठेवता आॅलम्पिकच्या मैदानापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडाशिक्षक विलास पाटील यांनी, चांगल्या सुविधांशिवाय खेळ वाढणार नसल्याचे सांगत कबड्डीचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी खेळाडूंना तशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्रो-लीगमध्ये कबड्डी मॅटवर खेळली गेली. त्यामुळे हा खेळ मातीत न खेळता मॅटवरच खेळला जावा असा आग्रह धरला जात असून, ही मागणी रास्त आहे. मात्र आता या मॅट ग्रामीण भागापर्यंत उपलब्ध करून देण्याचे खरे आवाहन असेल. माझ्या मते तालुकास्तरावर किमान दोन मॅट जिल्हा क्रीडा कार्यालयांकडून उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
क्रीडा संघटक आनंद खरे यांनी, कबड्डी मातीत खेळावी हा पर्याय पुर्वी उपलब्ध होता. मात्र आता कबड्डी वर्ल्डक्लास झाल्याने मॅटशिवाय पर्याय नाही. पूर्वी कुस्ती देखील मातीतच खेळली जात होती. मात्र कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मॅटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रो-लीगमुळे कबड्डीला चांगले दिवस आले असले तरी हे वातावरण कॅच करण्याची संघटनांनी जबाबदारी स्विकारावी. त्यासाठी अगदी ग्रामीण भागात संघटनांनी काम करण्याची तयारी ठेवावी. आपला अहंकार बाजुला सारून खेळाडूला केंद्रस्थानी ठेऊन त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविण्यासाठी पुरेशे प्रयत्न करावेत. त्याचबरोबर सरकार व संघटना यांच्यात समन्वय असण्याची गरज असल्याचेही खरे यांनी स्पष्ट केले.
प्रशिक्षक बजरंग परदेशी यांनी, कबड्डीला मिळत असलेले वैभव पाहता आता आॅलम्पिक वारी गाठण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. खेळाडूंसाठी आणखी जमेची बाब म्हणजे क्रि केटमध्ये ज्या उत्साहाने चित्रपट तारे आणि तारका गुंतवणूक करतात त्या उत्साहाने ते कबड्डी लीगमध्येही गुंतवणूक करत आहेत. याचबरोबर कबड्डीपटूंना चांगले मानधनही मिळत आहे. आशियाई क्र ीडा स्पर्धामध्ये कबड्डीचा समावेश झाला आहे. कबड्डीला मिळत असलेले वैभव लक्षात घेऊन सरकारने देखील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना योग्य मानधन देणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता कबड्डी महाराष्ट्राच्या मातीत रूजलेला खेळ आहे. मात्र या खेळाला हरियाणासारख्या राज्यामध्ये प्रसिद्धी मिळत असून तेथील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकत आहेत. देशाचं प्रतिनिधित्व करीत असताना राज्या-राज्यांमधील खेळाडूंमध्ये दुजाभाव करणे हा आमचा हेतु नाही. मात्र आपल्या राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे महाराष्ट्रातील खेळाडू योग्य संधीपासून वंचित असल्याचे परदेशी यांनी सांगितले. क्रीडा शिक्षक माणिक गिते यांनी, कबड्डीचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तालुकास्तरावरच मॅट उपलब्ध करून देण्याची गरज असून, आता ज्युनियर गटात देखील अशाप्रकारच्या प्रो-लीग आयोजित करण्याची गरज असल्याचे सांगितले. तालिम संघाचे सचिव मधुकर वाघ यांनी, शासनाकडे पुरेशे प्रशिक्षक उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडू पुरेशा संधीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर दोन प्रशिक्षक नेमण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्याची आवश्यकता आहे. पोलीस दलातील खेळाडू कपालेश्वर ढिकले यांनी, पोलीस दलातील खेळाडूंना पुरेशा संधी मिळत नसल्याने त्यांच्यामधील खेळाडूवृत्ती कालातराने नाहिशी होते. पोलीस खात्यात काम करीत असताना अगोदर ड्युटीला प्राधान्य दिले जाते. ड्युटीचा कालावधी निश्चित नसल्याने पोलिसांना पुरेसा सराव करता येत नाही. त्यामुळे पोलीस दलात भरती झालेल्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत विचार व्हायला हवा.
प्रशिक्षक कविता मोहिते यांनी, प्रो-लीगमुळे महिलांना देखील कबड्डीमध्ये उत्तम करीअर करण्याची संधी निर्माण झाली आहे. पहिल्या-वहिल्या महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारतीय महिलांनी बाजी मारल्याने या संधीचा विचार करून कबड्डीकडे सकारात्मकपणे बघावे. प्रा. सारिका जगताप यांनी, प्रो-लीग ही महिलांसाठी नवसंजीवणी असल्याचे सांगितले. खेळाडू कुंदण सोनवणे यांनी, प्रो-लीगच्या धर्तीवर कबड्डीवर देखील एखादा चित्रपट निर्माण झाल्यास कबड्डी हा खेळ घराघरात पोहचेल. त्याचबरोबर कबड्डीपटूंना देखील वेगळेच वलय निर्माण होईल. तर आदिनाथ गवळी याने, प्रो-लीग ही खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे खेळाडूंना आपल्या खेळाचा दर्जा उंचवावा.