नाशकातही ‘कडकनाथ’ फसवणुकीचा प्रकार ; कोंबडीपालन व्यावसायात १४ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 04:21 PM2019-09-10T16:21:09+5:302019-09-10T16:27:06+5:30
कडकनाथ कोंबडी व्यवासायात राज्यभरात फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असताना नाशिकमधील एका शेतकऱ्यालाही कडकनाथ कोंबडी पालन व्यावसायातील एका कंपनीने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. संबधित शेतकऱ्यांनी कंपनीविरोधोत फसवणुरीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक: कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात राज्यभरातून फसवणुकीचे गुन्हे समोर येत असताना नाशिकमध्येही महारयत अॅग्रो इंडिया या कंपनीने काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सय्यद पिंप्री येथील शिवदास भिकाजी साळुंखे (६३) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात महारयत अॅग्रो या कंपनीविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पोलिसांनी कंपनीच्या प्रमुख व्यवस्थापकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या इस्लामपूर येथील संशयित आरोपी सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे, संदीप सुभाष मोहिते, शिवदास भिकाजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या महारयत अॅग्रो इंडिया कंपनीच्या कॅनडा कॉर्नर येथील विराज टॉवरमधील कार्यालयात कामाला ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. त्यांनी कडकनाथ कोंबडीचे अंडे ३० रुपये प्रतिनग याप्रमाणे विकत घेण्याचे आश्वासन देत प्रतियुनिट तीन हजार ७०० रुपयांप्रमाणे एकूण तीन लाख ७० हजार रुपयांच्या दहा युनिटमध्ये गुंतवणूक करून घेतली होती. त्याबदल्यात त्यांना दहा युनिटचे कोंबडीचे पिल्लेही देण्यात आली. ही पिल्ले शिवदास साळुंखे यांनी तब्बल तीन महिना कंपनीच्या नियमानुसार वाढवितांना त्यातील काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे १३ लाख ९० हजार रुपयांच्या कोंबड्या कंपनीने परत नेल्या. परंतु, त्याबदल्यात कोणतीही रक्कम अदा केली नसल्याने साळुंखे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बैरागी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
कडकनाथचे राज्यभरात जाळे
महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात नाशिकसह राज्यभरातून जवळपास ६००हूनअधिक तक्रारी समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील इस्लामपूर केंद्रस्थान असलेल्या कडकनाथ कोंबडी प्रकरणात तक्रारदारांची संख्या रोज वाढत असून, नाशिकमधूनही या प्रकरणात अडकलेले शेतकरी समोर येऊन लागले आहेत. लाखो रुपयांची फसवणूक झालेले काही हजार लोक असून, यात कोट्यवधी रुपयांची फसणवूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना व्यवसायाची संधी म्हणून कडकनाथ कोंबडी पालनाकडे पाहणाऱ्या तरुण शेतकऱ्यांसमोर कोंबडीचे खाद्य संपले आहे. अंड्यांना ग्राहक नाही. कार्यालयांना टाळे असल्याने आता या कोंबड्यांचे काय करायचे? गुंतवलेले पैसे बुडणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.