कादवातिरी बिबट्यांची दहशत
By admin | Published: January 16, 2017 01:00 AM2017-01-16T01:00:05+5:302017-01-16T01:00:20+5:30
कादवातिरी बिबट्यांची दहशत
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील विविध नद्या व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असून, हे क्षेत्र बिबट्यांचे आश्रयस्थान बनत चालले असून, सध्या ऊसतोड होऊन उसाचे रान मोकळे होत असल्याने बिबट्यांचा वावर इतर क्षेत्रांत वाढत त्यांचा उपद्रव होत असून, दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत सात बिबटे व एक बछडा पकडले असले तरी अद्यापही कादवातिरी गावात बिबट्यांची दहशत कायम आहे.
दिंडोरी तालुक्यात कादवा नदीतिरी असलेल्या करंजवण लखमापूर, अवनखेड, ओझे म्हेळुस्के, अवनखेड, परमोरी, राजापूर तसेच वाघाड धरणाच्या क्षेत्रात जालखेड, कोकणगाव, चाचडगाव, उमराळे, निगडोळ, हातनोरे आदि परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असून, या परिसरात वारंवार बिबट्याचा वावर व उपद्रव दिसत असून, बिबट्यांनी वासरे, कुत्रे फस्त केले आहे. उसाचे क्षेत्र बिबट्यांचे आश्रयस्थान बनू लागले आहे; मात्र मागील आठवड्यात येथून जवळच असलेल्या राजापूर शिवारात एक नवजात बिबट्याचं बछडं सापडलं होतं; मात्र त्याची आई मादी ही अद्याप पिंजऱ्यात न आल्याने दहशत कायम आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी ती मादी बिबट्या तिच्या एक बछड्याच्या शोधात फिरत असून, तिच्यासोबत अजून एक बछडे असल्याचे बोलले जात आहे. करंजवण परिसरातही अजून बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच दिंडोरी तालुक्याचे ऊस क्षेत्र व धरण नद्यांचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आहे.
(वार्ताहर)